sweeper machine Tendernama
टेंडर न्यूज

Nashik : इटलीतील 33 कोटींचे झाडू करणार नाशिकची स्वच्छता

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : महापालिकेने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एन कॅप) निधीतून इटली येथून ३३ कोटी रुपयांना खरेदी केलेल्या बहुप्रतीक्षित यांत्रिकी झाडूद्वारे सोमवार (ता. ४) पासून शहरात स्वच्छता करण्यात येणार आहे. हे झाडू मागील महिन्यातच महापालिकेला देण्यात आले. मात्र,  प्रादेशिक परिवहन विभागाने नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यावर यांत्रिकी विभागाकडून झाडांची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यांत्रिकी झाडू खरेदी करण्यासाठी ३३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.

नाशिक महापालिका महासभेने २० ऑगस्ट २०२१ ला राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत सहा विभागात ३३ कोटींचे चार यांत्रिकी झाडू खरेदीचा निर्णय घेतला होता. यात पाच वर्षे देखभाल दुरुस्तीचाही समावेश आहे. या झाडू खरेदीसाठी एप्रिल २०२३ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आले.  

नाशिक शहरात २१५० किलोमीटर लांबीचे रस्ते असून या यांत्रिकी झाडुच्या माध्यमातून शहरातील प्रतिदिन १६० किलोमीटरचे रस्ते स्वच्छ केले जाणार आहेत. एका यांत्रिकी झाडूसाठी दोन कोटी सहा लाख रुपये, याप्रमाणे एकूण बारा कोटी ३६ लाख रुपये निव्वळ झाडू खरेदीसाठी खर्च होणार आहेत. त्यानंतर यांत्रिकी झाडू पुरवठादार कंपनीकडे पुढील पाच वर्षे यंत्र चालवणे, देखभाल दुरुस्ती, इंधन, मनुष्यबळ आदींची जबाबदारी असणार आहे. यासाठी महापालिका प्रत्येक महिन्याला ५ लाख ८५ हजार ७०० रुपये खर्च संबंधित पुरवठादारास देणार आहे.

यासाठी पाच वर्षांत महापालिकेचे  २१ कोटी ८ लाख रुपये खर्च होणार आहेत. एका यांत्रिकी झाडूच्या सहाय्याने एका दिवसात साडेतीन मीटर रुंदीच्या रस्त्यावर ४० किलोमीटरची स्वच्छता केली जाणार आहे. याप्रमाणे चार यांत्रिकी झाडूंच्या सहाय्याने प्रतिदिन १६० किलोमीटर रस्त्याची सफाई केली जाणार आहे.

नाशिक शहरातील सर्व विभागात आउट सोर्सिंगच्या माध्यमातून रस्ते- झाडलोट होते. त्यासाठी तीन वर्षासाठी ७५ कोटी रुपये खर्च करण्यात येतात. यांत्रिकी झाडूमुळे महापालिकेचा खर्च वाचणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुरवठादाराने ऑक्टोबरमध्येच महापालिकेला झाडू पुरवले. त्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने नोंदणीची प्रक्रिया करणे व यांत्रिकी विभागाकडून झाडांची चाचणी घेणे या बाबींची पूर्तता झाल्यानंतर हे झाडू प्रत्यक्षात सोमवारपासून शहरातील रस्ते झाडण्याचे काम करणार आहे.

यांत्रिकी झाडूने या रस्त्यांवर होणार स्वच्छता
- अशोक स्तंभ ते गंगापूर गाव
-  मुंबई नाका ते अशोक स्तंभ
-  सीबीएस ते कॅनडा कॉर्नर
-  कॅनडा कॉर्नर ते भोसला गेट
-  त्र्यंबक नाका सिग्नल ते सातपूर गाव
-  गडकरी चौक ते तिडके कॉलनी
-  चांडक सर्कल ते मुंबई नाका
- महात्मा गांधी रस्ता, मेन रोड, नेहरू उद्यान, शालिमार.
-  पंचवटी कारंजा ते रविवार कारंजा.