मुंबई (Mumbai) : मुंबईत नव्याने वर्सोवा ते वांद्रे, वर्सोवा ते विरार आणि नरिमन पॉईंट ते कुलाबा असे तीन सी लिंक (New Sea Link In Mumbai) प्रस्तावित आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) या सी लिंकसाठी टेंडर (Tender) प्रक्रिया, तसेच बांधकामपूर्व तयारीला सुरवात केली आहे. या तिन्ही सी लिंकचे बजेट साधारण २८ हजार कोटी इतके आहे. तसेच या सी लिंकमुळे मुंबईकरांचा प्रवास जलदगतीने होणार आहे.
वर्सोवा ते वांद्रे सी लिंक हा मुंबईच्या पश्चिम उपनगरातील सी लिंक आहे. हा रस्ता वांद्रे ते वरळी या सी लिंकला जोडला जाईल. यामुळे पश्चिम उपनगरांतून थेट दक्षिण मुंबईत जाणे सोपे होईल. शहरी भागात जात असलेली वाहने सी लिंकवरून पुढे सरकतील आणि मुंबईतल्या अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीचा भार कमी होण्यास मदत होईल. वर्सोवा ते वांद्रे सी लिंक हा 17.17 किमी लांबीचा रस्ता आहे. कार्टर रोड आणि जुहूसह 4 ठिकाणी वर्सोवा ते वांद्रे या सी लिंकला एन्ट्री आणि एक्झिट पॉईंट असतील. वर्सोवा ते वांद्रे या सी लिंकचा 9.6 किमी लांबीचा भाग समुद्रावर असेल तर उर्वरित रस्ता हा जमिनीवर असेल. हा सुमारे 7 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होईल. या रस्त्यावरून दररोज 50 हजार वाहने जातील.
वर्सोवा ते वांद्रे या सी लिंकला जोडणारा वर्सोवा ते विरार सी लिंक 43 किमी लांबीचा आहे. हा 21 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. या रस्त्यावरून दररोज 60 हजार वाहने जातील. वर्सोवा ते वांद्रे या सी लिंकला चारकोप, उत्तन, वसई या भागांमध्ये 6 लेन कनेक्टर आणि विरारमध्ये 8 लेन कनेक्टर असतील.
नरिमन पॉइंट ते कुलाबा सी लिंक चार लेनचा आहे. एका दिशेला 2 लेन आणि दुसऱ्या दिशेला 2 लेन असा हा रस्ता असेल. हा 1.6 किमी लांबीचा रस्ता असेल. या रस्त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होईल. सध्या वाहतूक कोंडीमुळे गर्दीच्या वेळेत नरिमन पॉईंट ते कुलाबा या प्रवासाला साधारण 30 मिनिटे लागतात. पण नरिमन पॉईंट ते कुलाबा सी लिंकमुळे हा प्रवास 5 मिनिटांत पूर्ण होईल. नरिमन पॉईंट ते कुलाबा सी लिंक हा 284.55 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होईल.
सर्व सी लिंक कार्यरत झाल्यावर कुलाबा किंवा नरिमन पॉईंट येथून तासाभरात विरारला पोहोचणे शक्य होणार आहे. मुंबईत सध्या वांद्रे ते वरळी हा सी लिंक कार्यरत आहे. शिवडी ते न्हावा शेवा हा सी लिंक डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे.