Narendr Modi Tendernama
टेंडर न्यूज

Narendra Modi : ...आणि आडम मास्तरांचा 'तो' शब्द PM मोदींनी खरा करून दाखविला!

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : सोलापूर जिल्ह्यातील रे नगर, कुंभारी येथील असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PM Awas) ३० हजार घरकुलांचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १५,०२४ घरांचे लोकार्पण आज (ता. १९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.            

हा गृह प्रकल्प देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प असून, असंघटित क्षेत्रातील 30 हजार कामगारांच्या घरकुलाचे स्वप्न यामुळे साकार होत आहे. या प्रकल्पाचा मूळ प्रस्ताव कम्युनिस्ट नेते नरसय्या आडम (आडम मास्तर) यांनी दिलेला होता. या प्रस्तावाला बळ देण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले.

रे नगर नावाने ओळखला जाणारा हा गृहप्रकल्प आता आशिया खंडातील सर्वांत मोठी कामगार वसाहती ठरणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्याच हस्ते या गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन ९ जानेवारी २०१९ रोजी करण्यात आले होते.

भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलताना आडम मास्तर यांनी ‘आजवर दुर्लक्षित या योजनेस बळ देत पंतप्रधान म्हणून तुम्ही भूमिपूजन केले. या घरांच्या चाव्या देण्यासाठीही पंतप्रधान म्हणून तुम्ही यावे’, असे वक्तव्य केले होते. आता या प्रकल्पाचे काम पूर्ण होत आले असून, पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरांचे असंघटित कामगारांना वितरण मोदींनी आज केले.

हा देशातील पहिलाच असंघटित कामगारांसाठीचा गृहप्रकल्प आहे. हा प्रकल्प ३६५ एकर जागेवर असून, या प्रकल्पामध्ये एकूण ८३३ इमारती आहेत. प्रत्येक इमारतीत ३६ घरे आहेत. कचरा उचलणारे, विडी कामगार, बांधकाम कामगार, वस्त्रोद्योग कामगार इत्यादी असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी ही घरकुले आहेत.

केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानाव्यतिरिक्त पायाभूत सुविधा व बीज भांडवलाकरिता राज्य सरकारने अर्थसाहाय्य दिले आहे. पाणीपुरवठा, वीजपुरवठा, सांडपाणी व्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधांबरोबरच सोलार व डिजिटल पत्ता या सुविधाही पुरविण्यात आल्या आहेत.

या प्रकल्पामध्ये उजनी जलाशयातून पाणी पुरवठा, मलशुद्धीकरण केंद्र (STP), स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा, शाळा, अंगणवाडी, खेळाचे मैदान, रुग्णालय, कौशल्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, रुफटॉप सोलर योजना, रेन वॉटर हार्वेस्टिंग या सुविधा आहेत.