Narendra Modi, Nitin Gadkari Tendernama
टेंडर न्यूज

Narendra Modi : अबब!! प्रती किलोमीटर 250 कोटींचा खर्च; मोदी सरकारवर CAG चे ताशेरे!

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : केंद्रीय रस्ते वाहतूक खात्याच्या एका रस्ते प्रकल्पाच्या किंमतवाढीची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. द्वारका एक्स्प्रेस वे (Dwarka Expressway) मार्गावर प्रती किलोमीटर १८ कोटी २० लाख रुपये बांधकामाचा खर्च तब्बल २५० कोटी ७७ लाख रुपयांवर पोहोचला आहे. यासंदर्भात कॅग (CAG) अर्थात भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षकांनी मोदी सरकारवर (Modi Government) ताशेरे ओढले आहेत. द्वारका एक्स्प्रेस वेला कोणत्याही सविस्तर अहवालाशिवायच मंजुरी देण्यात आल्याचेही 'कॅग'ने म्हटले आहे. (Narendra Modi - Nitin Gadkari - CAG Roport News)

कॅगच्या ताज्या अहवालामध्ये दिल्ली ते गुरगाव या राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील २९.०६ किलोमीटरच्या टप्प्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या २९.०६ किलोमीटर मार्गामध्ये ८ एलिव्हेटेड मार्गिका तर सहा सामान्य मार्गिकांचा समावेश आहे. दिल्ली-गुरगाव राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून हा प्रकल्प हाती घेण्यात आला. भारत परियोजना २०१७-१८ ते २०२०-२१ चा भाग म्हणून या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे.

कॅगने आपल्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे, द्वारका एक्स्प्रेस वे आधी हरियाणा सरकारकडून बांधला जाणार होता. यासाठी हरियाणा सरकारने १५० मीटर रुंदीचा पट्टा अधिग्रहीत केला. मात्र, यानंतर या प्रकल्पासंदर्भात हरियाणा सरकारकडून कोणतीही प्रगती न झाल्यामुळे हा प्रकल्प भारत परियोजनेत समाविष्ट करण्यात आला. त्यासाठी हरियाणा सरकारने ९० मीटर रस्ता रूंदीचा पट्टा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला मोफत हस्तांतरीत केला.

“प्रकल्पाच्या आधीच्या नियोजनानुसार १४ सामान्य मार्गिकांचा महामार्ग बांधला जाणे अपेक्षित होते. त्यासाठी हरियाणा सरकारने हस्तांतरीत केलेला ९० मीटर रुंदीचा पट्टा पुरेसा होता. मात्र, कोणतेही स्पष्ट कारण न देताच या ठिकाणी १४ सामान्य मार्गिकांच्या रस्याऐवजी ८ उन्नत मार्गिका व ६ सामान्य मार्गिका असा बदल करण्यात आला. इतक्या मोठ्या बांधकामामुळेच या प्रकल्पासाठी तब्बल ७ हजार २८७ कोटी २९ लाख रुपये एवढी मोठी रक्कम मंजूर करण्यात आली. त्यानुसार प्रकल्पाच्या प्रत्येक किलोमीटरचा एकूण खर्च २५० कोटी ७७ लाख इतका वाढला”, असेही कॅगने आपल्या अहवालात म्हटले आहे.

द्वारका एक्स्प्रेस वेवरील या मार्गासाठी प्रकल्प मंजूर झाला तेव्हाचा खर्च होता १८ कोटी २० लाख रुपये प्रती किलोमीटर इतका. पण आता या प्रकल्पाच्या बांधकाम खर्चात १४ पटींहून जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या किंमत वाढीची जोरदार चर्चा रंगली आहे.

यासंदर्भात केंद्रीय वाहतूक विभागाने दिलेल्या उत्तरावरही कॅगने आक्षेप घेतला आहे. मंत्रालयाच्या सांगण्यानुसार, या मार्गाला इतर अनेक मार्ग येऊन मिळतात. त्यामुळे दोन राज्यांमधील वाहतूक मंदावली असती. याचसाठी हा मोठा उन्नत मार्ग बांधण्याचा बदल प्रकल्पात करण्यात आला. मात्र, यावर कॅगने वाहतूक विभागाचे कान टोचले आहेत. “या मार्गावर ज्या ठिकाणी इतर मार्ग येऊन मिळतात, त्या भागात उड्डाणपूल किंवा अंडरपास बांधता आले असते. तेवढ्यासाठी ८ मार्गिकांचा पूर्ण रस्ताच उन्नत करणे योग्य ठरत नाही”, असेही कॅगने म्हटले आहे.