Rojgar Melava Tendernama
टेंडर न्यूज

NAMO Maha Rojgar Melava : मुंबई, ठाण्यासह कोकणातील बेरोजगार युवकांसाठी Good News

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील बेरोजगार युवक व युवतींकरिता नमो महारोजगार मेळाव्याचे (NAMO Maha Rojgar Melava) आयोजन करण्यात आले आहे. येत्या २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी हायलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे (पश्चिम) येथे हा मेळावा सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होईल.

मेळाव्यात विविध आस्थापनांनी रिक्त पदांची माहिती नोंदवावी तसेच नोकरी इच्छूक युवक-युवतींनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले. वांद्रे पूर्व येथे नमो महारोजगार मेळाव्याच्या पूर्वतयारी संदर्भात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी क्षीरसागर बोलत होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, या रोजगार मेळाव्यामध्ये शासनाच्या प्रत्येक विभागाने आपल्या रिक्त पदांची माहिती तातडीने नोंदवावी. दहावी, बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेवून रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. राज्यातील नामांकित स्टार्ट अप, शासनाची विविध महामंडळे यांचे स्टॉल उमेदवारांना माहिती देण्याकरिता असतील. उमेदवारांना करियर विषयक माहिती देण्याकरिता समुपदेशन सत्र होणार आहे.

मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. https://qr-codes.io/gdhSNd किंवा www.rojgar.mahaswayam.gov.in या लिंक वर जाऊन उमेदवार नोंदणी व नोकरीकरिता अर्ज करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. याची माहिती जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचवावी. रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त युवक आणि युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामुळे सर्व विभागांनी मिळून हा रोजगार मेळावा यशस्वी करावा.

नमो महारोजगार मेळाव्याकरिता जास्तीत जास्त संधी उपलब्ध होण्याकरिता कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय तसेच उद्योग व कामगार विभाग यांना विविध कंपन्याशी संपर्क साधून रिक्त पदे अधिसूची जाहीर करण्याबाबत निर्देश देण्यात आले.

कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी करून रिक्त पदे अधिसूचित/जाहीर करणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी किंवा 1800 120 8040 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी रवींद्र सुरवसे, सहायक आयुक्त कौशल्य विकास मुंबई उपनगर, संदीप गायकवाड, सहायक आयुक्त मुंबई शहर व जिल्हा कौशल्य विकास अधिकारी श्री. पा. कोकाटे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी किशोर केरलीकर, शासकीय तंत्रनिकेतन मुंबईचे प्रशिक्षण अधिकारी काशिनाथ धुळशेटे, वरिष्ठ संरक्षण अधिकारी गिरीधर चौरे, सहाय्यक कामगार आयुक्त नीलेश देठे, जिल्हा व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण अधिकारी योगिता शंभरकर, उद्योग निरीक्षक विवेक लोखंडे यांसह इतर विविध विभागांचे अधिकारी तसेच विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.