Nitin Gadkari Tendernama
टेंडर न्यूज

Nagpur: 4 महिन्यातच नव्या पुलावर खड्डे; गडकरी साहेब चौकशी कराच...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : कन्हान नदीवरील (Kanhan River) नवीन पुलाचे लोकार्पण होऊन अवघे चार महिने झाले असताना या नवीन पुलावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. एवढेच नव्हे तर खड्ड्याच्या बाहेर सळ्याही निघाल्या आहेत.

कन्हान शहर विकास मंचच्यावतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह आमदार आशिष जयस्वाल यांना निवेदन देऊन ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. कन्हान नदीवरील नवीन पुलासाठी ५० कोटी ६० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तब्बल ८ वर्षे या पुलाच्या बांधकामाला लागले. केंद्रात आघाडीचे सरकार असताना या पुलाचे बांधकाम मंजूर झाले होते. तत्कालीन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री मुकुल वासनिक यांनी या पुलाचे भूमिपूजन केले होते. नंतरच्या निवडणुकीत वासनिक पराभूत झाले आणि केंद्रातूनही काँग्रसची सत्ता गेली. त्यामुळे अनेक वर्षे निधी पडून होता. पुलाचे बांधकामही पुढे सरकात नव्हते. नागरिकांची ओरड आणि तक्रारीमुळे कसेतरी बांधकाम पूर्ण करण्यात आले.

याचा फायदा संबंधित ठेकेदाराने घेतला. थातूरमातूर कामे केली. बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही सुमारे वर्षभर तो खुला करण्यात आला नाही. शेवटी कंटाळून लोकांनी येथील बॅरिकेड्‍स तोडून फेकले होते. पुलाचे लोकार्पण केल्याशिवाय गत्यंतर नसल्याचे बघून अधिकाऱ्यांनी मुहूर्त काढला. १ सप्टेंबर २०२२ ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि विद्यमान विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, रामटेक लोकसभा खासदार  कृपाल तुमाने, रामटेक विधानसभा आमदार आशिष जयस्वाल, कामठी विधानसभा आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार मल्लीकार्जुनजी रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुलाचे लोकार्पण करण्यात आले.

त्यानंतर या नवनिर्मित पुलावरून जड वाहतूक, ट्रॅव्हल्स, बसेस, फोर व्हीलर, टू व्हीलरसह अनेक प्रकारची हजारो वाहने दररोज धावत आहेत. अशात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पुलावरील वाहतूक पुन्हा थांबवावी लागणार असल्याचे दिसून येते.