नागपूर : नागपूर महापालिकेतील स्टेशनरी घोटाळा मुंबई येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पोहचला आहे. नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांनी या घोटाळ्याकडे लक्ष वेधून महापालिका बरखास्त करण्याची मागणी सभागृहात केली आहे. तत्पूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लेखी पत्र देऊन या घोटाळ्या बाबग अवगत केले आहे.
२० वर्षांपूर्वी नागपूर महापालिकेती भाजपची सत्ता असताना क्रीडा साहित्य घोटाळा उघडकीस आला होता. त्यामुळे अनेक नगरसेवकांना तुरुंगाची हवा खावी लागली होती. या संदर्भातील कोर्टकचेऱ्या आजही सुरू आहेत. त्यावेळी राज्यात काँग्रेसची सत्ता होती. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी सनदी अधिकारी नंदलाल यांची क्रीडा घोटाळ्याचा तपास करण्यासाठी एक सदस्यीय समिती नेमली होती. विशेष म्हणजे नंदलाल हे घोटाळ्याच्या काही वर्षे आधी नागपूर महापालिकेचे आयुक्त होते. यामुळे चांगलीच उलथापालथ झाली होती. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप पराभूत झाली होती. विकास ठाकरे प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आले आणि थेट महापौरांच्या खुर्चीवर विराजमान झाले होते.
तब्बल २० वर्षानंतर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर स्टेशनरी घोटाळा उघडकीस आला आहे. तब्बल १५ वर्षांपासून महापालिकेवर भाजपचे वर्चस्व आहे. या दरम्यान कोट्यवधीचे घोटाळे झाले आहेत. स्टेशनरी खरेदीच्या चौकशीतून महापालिकेती अनेक घोटाळे चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. त्यांच्हपालिकेत ६७ लाखांचा स्टेशनरी घोटाळा समोर आला आहे. चार कर्मचाऱ्यांसह पुरवठादारास अटक केली. मनोहर साकोरे नावाच्या पुरवठादाराने कुठल्याही साहित्य पुरवठ्याशिवाय देयके उचलली आहेत. आरोग्य विभागाशिवाय याच कंत्राटदाराने जन्म व मृत्यू विभाग, शिक्षण, सामान्य प्रशासन विभागालाही स्टेशनरीचा पुरवठा केला आहे. सुमारे चाळीस वर्षांपासून हाच कंत्राटदार साहित्याच्या पुरवठा करीत आहेत. यावरून त्याचे अधिकाऱ्यांसोबत साटेलोटे असल्याचे स्पष्ट होते. हा पुरवठा फक्त महापालिकेच्या मुख्यालयातील स्टेशनरी पुरवठ्याचा आहे.
नागपूर महापालिकेत एकूण १० झोन आहेत. तेथेही मोठ्या प्रमाणात स्टेशनरी खरेदी केली जाते. यापूर्वी भाजपच्याच कार्यकाळात क्रीडा साहित्य घोटाळा उघडकीस आला होता. घोटाळ्याच्या तपासणीसाठी नंदलाल समितीची नियुक्ती तत्कालीन सरकारने केली होती. अनेक नगरसेवकांना पोलिस कोठडीत डांबण्यात आले होते. क्रीडा घोटाळ्याप्रमाणेच स्टेशनरी घोटाळ्याची चौकशी करणे आवश्यक आहे. पंधरा वर्षांपासून महापालिकेत भाजपची सत्ता आहे. याकाळातील सर्व व्यवहाराची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. सत्ताधारी आणि आयुक्तांचा प्रशासनावर कुठलाही वचक राहिला नाही. त्यामुळे महापालिकेचे प्रशासन सैरभैर झाले आहे. त्यामुळे तातडीने उच्च स्तरीय चौकशी नेमावी आणि महापालिका बरखास्त करून भ्रष्टाचाराचे पाळेमुळे खणून काढावे अशी मागणी विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.