नागपूर : डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सिव्हिल लाईन येथील डांबरी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने पुढाकार घेतला. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यांची देखभाल केली जात होती. परंतु हे रस्ते आता महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आले. त्यामुळे या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आर्थिक संकटातील महापालिकेवर १ कोटी १९ लाखांचा भुर्दंड बसणार आहे.
अधिवेशनासाठी सर्व मंत्रिमंडळ, आमदार, राजकीय नेते नागपुरात येतात. त्यामुळे सिव्हिल लाईन परिसरातील रस्त्यांवरून या सर्वांची ये-जा असते. परंतु सद्यस्थितीत सिव्हिल लाईन परिसरातील सर्वच डांबरी रस्त्यांची दुर्दशा झाली असून वाहने चालविणेही कठीण झाले आहे. दुचाकीवरून प्रवास करताना पाठीच्या मणक्यांना त्रास होत आहे. या रस्त्यांची जबाबदारी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती. दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यांची दुरुस्ती केली जात होती. आता महापालिका या रस्त्यांची दुरुस्ती करणार आहे.
शिक्षण मंडळ कार्यालय ते आरबीआय कॉलनी रोड ते आमदार निवासापर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली असून येथे डांबरीकऱणासाठी महापालिका १ कोटी १९ लाख रुपये खर्च करणार आहे. याशिवाय मेट्रो कार्यालय ते उच्च न्यायालय आणि राजभवन चौक ते काटोल नाका चौकापर्यंतच्या रस्त्यांचे कंत्राट मेसर्स प्रेमचंद रचुमल यांच्या कंपनीला देण्यात आले आहे. स्थायी समितीने नुकताच या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाच्या खर्चाला मंजुरी दिली. विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूवर महापालिका या कामाला प्राधान्याने पूर्ण करणार असल्याचे मनपातील सुत्राने नमुद केले. या रस्त्यांशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चार डांबरी रस्त्यांचे रुपांतर सिमेंट रस्त्यात करण्यात येणार आहे. या चार रस्त्यांसाठी महापालिकेने अडीच कोटींच्या खर्चाचा अंदाज व्यक्त केला आहे. महापालिका या रस्त्यांशिवाय पूर्ण दुर्दशा झालेल्या ११ रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी १४ कोटी ७० लाख रुपये खर्च करणार आहे. ऑटोमोटिव्ह चौक ते मोहम्मद रफी चौकापर्यंतच्या रस्त्यासाठी २ कोटी ८३ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.
अंतर्गत रस्ते केव्हा?
एकीकडे व्हीव्हीआयपीसाठी रस्ते गुळगुळीत करण्यात येत आहे. त्याचवेळी शहरातील अनेक वस्त्यांमध्ये रस्तेच नाही. अनेक वर्षांपासून या वस्त्यांतील नागरिक केवळ गिट्टी, मुरूम असलेल्या रस्त्यांवरून ये-जा करीत आहे. पावसाळ्यात तर घराबाहेर निघणेही कठीण होते. दक्षिण नागपुरातील पिपळा रोडवरील गजानननगर, शारदानगर, सिद्धेश्वरीनगरातील नागरिकांंना वाहने घरापासून लांब ठेवत पायी जावे लागत आहे. या वस्त्यांत कधी रस्ते होणार? असा प्रश्न या परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.