Samruddhi Mahamarg Tendernama
टेंडर न्यूज

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर; आता 'ही' नवी डेडलाईन

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर (Mumbai-Nagpur) समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दिवाळीत होण्याची शक्यता होती. मात्र, आता समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. हा टप्पा लवकरात लवकर सुरु करण्याचा प्रयत्न असून येत्या नोव्हेंबरपर्यंत हा मार्ग सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिली. त्यामुळे दिवाळीतील मुहूर्त बारगळला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरांना समृद्धी महामार्गाद्वारे जोडले जात आहे. या महामार्गाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान मोदी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नागपूरमध्ये येणार होते. नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या समृद्धी महामार्गाच्या पहिला टप्प्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. त्याचे लोकार्पण दिवाळीत होणार होते. नागपूर-मुंबई दरम्यानची वाहतूक सुलभ व्हावी, या उद्देशाने 31 जुलै 2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 701 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाची घोषणा विधानसभेत केली होती. प्रत्यक्षात राज्याच्या 10 जिल्ह्यांतून हा महामार्ग जात असला तरी, एकूण 24 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाचा कॅन्सर हॉस्पिटल प्रकल्प तयार झाला आहे. या उद्घाटनाला सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा उपस्थिती राहणार आहेत. त्यामुळे राज्य सरकार सुद्धा याच वेळी समृध्दी महामार्गाच्या पहिल्या टप्याचे उद्घाटन करण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालय पंतप्रधान कार्यालयाशी संपर्कात असून, प्राथमिक स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटनासाठी होकार दिल्याची माहिती आहे. त्यानुसार दिवाळीत समृध्दी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन २३ ऑक्टोंबर रोजी नागपुरात पार पडण्याची शक्यता होती.

मात्र, आता पुढील महिन्यात समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावण्याची शक्यता आहे. महामार्गाच्या बांधकामाच्या सुरुवातीला अनेक अडचणी आल्या आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात आहे. सरकारकडून वारंवार हा महामार्ग सुरू करण्यासंबंधी तारखाही घोषित करण्यात आल्या आहेत. यापूर्वीच्या सरकारकडून ऑक्टोबर 2021, 31 डिसेंबर 2021 आणि 31 मार्च 2022 ही तारीख देण्यात आली होती. मात्र, अजूनही समृद्धी महामार्गाचे काम अपूर्ण असल्याची माहिती आहे. आता नोव्हेंबर महिन्यात समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.