नागपूर (Nagpur) : तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र नागपूरची मेट्रो रेल्वे (Metro Rail) उड्डाणपुलाच्या (Flyover) चवथ्या माळ्यावरून लवकरच धावणार आहे. या मार्गाची ट्रयल मंगळवारी घेण्यात आली आहे. पुलाच्या चवथ्या मजल्यावरून कॅटनरी मेंन्टेन्स व्हेईकल (CMV) यशस्वीरित्या धावली आहे.
कस्तुरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह चौकापर्यंतच्या मेट्रो मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. याच मार्गावर नागपूरचे नाव जगाच्या नकाशावर अभिमानाने घेतले जाईल, असा चार मजली पूल तयार होत आहे. या पुलाचे दोन मजले पूर्णपणे लोखंडी आहेत. आज प्रथमच पाहणीच्या निमित्ताने सीएमव्ही वाहन या चार मजली पुलावरील मेट्रो ट्रॅकवर धावले. यातून महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित, प्रकल्प संचालक महेश कुमार, रोलिंग स्टॉक आणि सिस्टमचे संचालक सुनील माथूर, नियोजन विभागाचे संचालक अनिल कोकाटे, कार्यकारी संचालक गिरिधारी पौनीकर, नरेश गुरबानी, राजेश पाटील, उदय बोरवणकर, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक प्रकाश मुदलीयार, महाव्यवस्थापक सुधाकर उराडे यांनी ऑटोमोटिव्ह चौकापर्यंतच्या ट्रॅकची पाहणी केली.
प्रथमच विशालकाय पुलावरून सीएमव्ही वाहन धावले. हे वाहन धावताना बघून नागरिकांनी आनंदाने मेट्रोला सलामी दिली. कामठी मार्ग अतिशय वर्दळीचा असून, या मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात शाळा, कॉलेज, बँक, शासकीय कार्यालय, व्यावसायिक संकुल, दुकाने आहेत. तुर्तास सीताबर्डी ते कस्तुरचंद पार्कपर्यंत मेट्रो धावते आहे. या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर कस्तुरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत मेट्रो धावणार आहे.
ऑटोमोटिव्ह चौकापर्यंतचे ९९ टक्के काम पूर्ण झाले. अंतिम टप्प्यातील उर्वरित कामे लवकरच पूर्ण होतील. या मार्गावर मेट्रोचा पहिला प्रवास सीएमआरएसच्या पथकाचा राहील. सीएमआरएस पथकाच्या समाधानानंतर अधिकारी या मार्गावर प्रवासाला मंजुरी देतील.
- डॉ. ब्रजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो