Nagpur Metro Tendernama
टेंडर न्यूज

नागपुरात धक्के मारून चालवावी लागणार मेट्रो, कारण...

महापालिका, नागपूर सुधार प्रन्यासचा ५५५ कोटी रुपये देण्यास नकार

टेंडरनामा ब्युरो

नागपूर : नागपूरची मेट्रो रेल्वे पूर्ण क्षमतेने धावायच्या आतच महामेट्रो रेल्वेने काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. मेट्रोला नागपूर महानगर पालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास यांच्याकडून ५५५ कोटी रुपये घ्यायचे आहे. ते जनतेच्या करातून वसूल करायचे आहे. मात्र महापालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने सत्ताधारी भाजपला जोखीम घ्यायची नसल्याने मेट्रो रेल्वेचे भवितव्य अधांतरी झाले आहे.

महामेट्रोच्या कामात सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची अनियमितता असल्याचा आरोप जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांचा आहे. ते सातत्याने मेट्रोचे घोटाळे उजागर करीत आहे. मात्र मेट्रो त्याची दखल घेत नाही आणि आरोपांचे खंडनही करीत नाही. मेट्रो रेल्वेला भाजपच्या बड्या नेत्यांचे पाठबळ आहे. राज्यात आघाडीची सत्ता असतानाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही मेट्रो रेल्वेतील घोटाळ्याबाबत बोलण्याची हिंमत करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नागपूर सुधार प्रन्यासला १८९ कोटी आणि नागपूर महापालिकेला ३६६ कोटी रुपये महामेट्रोला देणे आहे. मात्र या निधीची दोन्ही संस्थांनी आपल्या अर्थसंकल्पात तरतूद केली नाही. त्यातच नागरिकांकडून वाढीव विकास शुल्क घेण्यास महापालिकेने नकार दिला आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर ‘५-डी बीम'मुळे महामेट्रोच्या खर्चात १२०० कोटी रुपयांची बचत होईल असा दावा महामेट्रोचे प्रमुख ब्रिजेश दीक्षित यांनी केला होता. त्यामुळे बाराशे रुपये कुठे गेले असा सवाल आता जय जवान जय किसान संघटनेच्यावतीने उपस्थित केला जात आहे.
महामेट्रोच्या आर्थिक प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये मेट्रो चालवण्याचा खर्च नागपूरच्या जनतेकडून कराच्या माध्यमातून महापालिकेला वसूल करायचा आहे. त्यानुसार महापालिकेला २२ हजार कोटी रुपयांचा कर वसूल करायचा आहे. या करारावर महापालिका आयुक्तांनी स्वाक्षऱ्यासुद्धा केल्या आहेत. सुरुवातीला ही बाब दडवून ठेवण्यात आली होती. मात्र ती उघड होताच पदाधिकाऱ्यांनी यास नकार दिला. वाढीव विकास शुल्काला स्थगिती दिली आहे. मात्र निवडणूक आटोपल्यानंतरही दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्यथा मेट्रोला धक्के मारून चालवावे लागणार आहे.

महामेट्रो रेल्वेतील नोकर भरती घोटाळाही चांगलाच गाजत आहे. ओबीसींचे आरक्षण डावलून नोकर भरती करण्यात आल्याचा आरोप मेट्रो रेल्वेवर आहे. ओबीसी खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मेट्रोला पत्र देऊन माहिती देण्यास सांगितले आहे. दुसरीकडे माजी राज्यमंत्री आणि भाजपचे आमदार परिणय फुके यांनीही नोकर भरतीत ओबीसींना डावलले काय याची विचारणा मेट्रोकडे केली आहे. मात्र दोन्ही लोकप्रतिनिधींच्या उत्तराला एक महिला उलटूनही मेट्रो रेल्वे प्रशासनाने उत्तर दिले नाही.