Nagpur Tendernama
टेंडर न्यूज

Nagpur : G-20चे विदेशी पाहुणे ठरले हिरो; नागपूरकरांच्या पदरात झिरो

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : G-20च्या तयारित नागपूर महापालिका (NMC) सामान्य लोकांच्या समस्येला पाठ दाखवत असल्याचे चित्र समोर आले आहे. नागपूरच्या अलंकार टॉकीज चौकात एका नागपूरकरतर्फे लावलेल्या बॅनरमुळे स्पष्ट झाले आहे की, सामान्य लोकांना महापालिकेच्या उदासीनतेमुळे किती त्रास होत आहे. अलंकार टॉकिज चौकात विदेशी पाहुण्यांच्या स्वागतावर कोट्यवधींचा खर्च केला जात असून, नागपूरकरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याबाबत एका नागपूरकराने लावलेले बॅनर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी लक्षवेधक ठरले आहे.

जी-20 बैठक 21 आणि 22 मार्च रोजी नागपुरात होणार आहे. त्यासाठी प्रशासन तयारीत व्यस्त आहे. दोन दिवसीय बैठकीसाठी 40 देशांचे 140 प्रतिनिधी येणार आहेत. पाहुण्यांसाठी वर्धा मार्गावरील दोन हॉटेल्समध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जी-20 ची तयारी आणि आयोजनासाठी सरकारकडून 50 कोटी निधी देण्यात आले आहे. 

एकीकडे जी - 20 साठी युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत तर याउलट शहरातील नागरिकांच्या समस्यांकडेच मात्र ढुंकूनही पाहिले जात नसल्याचे उलटे चित्र समोर आले आहे. गेल्या वर्षभरापासून महापालिकेवर प्रशासक असून सामान्य नागरिकांच्या समस्येवर दुर्लक्ष होत आहे. अनेक रस्ते वर्षानुवर्षे अजूनही दुरुस्तीची वाट बघत आहे, त, जी-20 साठी नागपूर विमानतळापासून प्रतिनिधींकडून वापरल्या जाण्याची शक्यता असलेल्या सर्वच मार्गांचा कायापालटचे काम सुरू झाले आहे.

शहरातील ऐतिहासिक स्थळे, ताडोबा, फुटाळा आदी ठिकाणच्या रस्त्यांची कामे मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक कला, संस्कृती, खाद्यसंस्कृती, पर्यटन, शासकीय विभागांची माहिती, जुन्या वास्तूंची भव्यता, आकर्षकता याविषयीची माहिती सादरीकरणाद्वारे देण्याचेही नियोजन आहे.

तक्रारिकडे दुर्लक्ष

महापालिकेकडून दर महिने लाखो रुपयो सोशल मीडिया हाताळणाऱ्या एजन्सीवर खर्च केला जातो. तरीसुद्धा नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. नागरिकांच्या मुलभूत तक्रारीही सोडविण्यात येत नसल्याने नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी मनपाने थांबवावी अशी संतप्त मागणी अलंकार चौकात बॅनर लावून केली जात आहे.