मुंबई (Mumbai) : मुंबई महानगर परिसरातील (MMR) 27 उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) घेतला आहे. यात मुंबईतील महत्त्वाच्या पुलांचा समावेश आहे. पुलांची भार क्षमता, बेअरिंगची स्थिती, पुलाची मजबुती तपासण्यासह पुलाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे का, याची तपासणी करण्यात येणार आहे. (Structural Audit Of Mumbai Flyovers)
एमएसआरडीसीने मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 1996 मध्ये 55 उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, 27 उड्डाणपूल, 4 भूयारी मार्ग, एक रेल्वे ओव्हर ब्रीज, एक खाडीपूल, चार जंक्शन असे एकूण 37 पूल बांधण्यात आले. यापैकी 27 उड्डाणपुलावरील पथकर वसुलीचे अधिकार संपुष्टात येणार असून, त्यानंतर हे उड्डाणपूल मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित केले जाणार आहेत. पुढच्या आठवड्यापासून या कामाला सुरूवात होणार आहे आणि एका महिन्याच्या आत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश एमएसआरडीसीने दिले आहेत.
हे उड्डाणपूल हस्तांतरित करताना ते मजबूत अवस्थेत असावेत असे या हेतूने एमएसआरडीसीने 27 उड्डाणपुलांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला मुंबई आयआयटीमार्फत ही तपासणी करण्याचा निर्णय घेत हे कामही आयआयटीला देण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला होता. मात्र, आता यात बदलत करत व्हीजेटीआयकडून सखोल तपासणी करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतल्याची माहिती उच्चपदस्थांनी दिली.
सीएसटी उड्डाणपूल-चेंबूर, अंधेरी घाटकोपर लिंक रोड पूल-चेंबूर, विक्रोळी पूल-विक्रोळी, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड पूल-कांजूरमार्ग, गोरेगाव मुलूंड लिंक रोड पूल-मुलूंड, नितीन कास्टिंग पूल- ठाणे, गोल्डन डाईज पूल- ठाणे, कलिना वाकोला पूल- सांताक्रुझ, आरे कॉलनी पूल- गोरेगाव, फिल्मसिटी पूल- गोरेगाव, नॅशनल पार्क पूल- बोरिवली, सायन उड्डाणपूल-शीव, बीएआरसी जंक्शन पूल-अनुशक्ती नगर, वाशी पूल- वाशी आदी पुलांची तपासणी करण्यात येणार आहे.