MTHL Tendernama
टेंडर न्यूज

एमटीएचएलचे 98 टक्के काम पूर्ण; प्रकल्प खर्चात 2 हजार कोटींची वाढ

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : शिवडी ते न्हावा शेवा अर्थात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) पुलाचे सुमारे ९८ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, लवकरच संपूर्ण काम पूर्ण करण्याचे उद्धिष्ट आहे. या प्रकल्पाच्या खर्चात तब्बल २ हजार १९२ कोटी रुपयांची वाढ झाल्याचे माहिती अधिकारात पुढे आली आहे. तसेच आतापर्यंत २ डेडलाईन चुकविणाऱ्या कंत्राटदारांना कोणताही दंड आकारण्यात आलेला नसल्याचे दिसून येते. या पुलामुळे मुंबईतून नवी मुंबईत जायला केवळ २० मिनिटे लागणार आहेत.

मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच मुंबई शहर आणि नवी मुंबई यामधील दळणवळण वाढण्याच्या दृष्टीने 2004 पासून मुंबई पारबंदर प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या मंजुरीनंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) 21.8 किमी लांबीचा सहा लेनच्या समुद्री मार्गाचे बांधकाम हाती घेतले आहे. यात 16.5 किमीचा समुद्रातून जाणारा मार्ग आणि उर्वरित 5.3 किमीचा जमिनीवरील रस्ता यातून मुंबई आणि नवी मुंबई या शहरांना जोडले जाणार आहे. हा मार्ग मध्य मुंबईत शिवडी, मुंबईच्या खाडीवर शिवाजी नगर आणि नवी मुंबईत राष्ट्रीय महामार्ग 348 वर चिरले येथे जोडला जाणार आहे. प्रकल्प प्रत्यक्षात आल्यानंतर हा सागरी सेतू भारतातील सर्वात लांब ठरणार आहे.

या पुलामुळे थेट रायगड जिल्ह्यात पोहोचता येणार असल्याने जेएनपीटी, पुणे, अलिबाग, गोवा या ठिकाणी जाणाऱ्या वाहनचालकांची सोय होणार आहे. पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच ते पूर्ण केले जाईल, असे एमएमआरडीएचे नियोजन आहे. दरम्यान, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या प्रकल्पाची माहिती मागितली होती. यावर प्राधिकरणाने दिलेल्या कागदपत्रांतून प्रकल्प खर्चात झालेली वाढ समोर आली आहे. प्रकल्पाचा मूळ खर्च १४ हजार ७१२.७० कोटी होता. यात २ हजार १९२.७३ कोटींची वाढ झाली. आता १६ हजार ९०४.४३ कोटी इतका खर्च झाला आहे. कंत्राटदारांनी २२ सप्टेंबर २०२२ रोजी काम पूर्ण करणे अपेक्षित होते. एमएमआरडीएने २२ सप्टेंबर २०२३ ही प्रथम मुदतवाढ दिली. तर १५ डिसेंबर २०२३ ही दुसरी मुदतवाढ होती. पण अद्यापही काम पूर्ण झालेले नाही.

पॅकेज १, २ आणि ३ ची सर्वसाधारण भौतिक प्रगती-९८.९२ टक्के आहे. पॅकेज ४ ची भौतिक प्रगती ८२ टक्के तर सरासरी भौतिक प्रगती ९८.४१ टक्के इतकी आहे.

पॅकेज १
लार्सन अँड टुब्रो लिमिटेड आयएचआय इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टीम कंसोर्शिअमची टेंडर किंमत ७ हजार ६३७.३० कोटी होती. यात ९९९.६७ कोटींची वाढ झाली.
----------
पॅकेज - २
देवू इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन व टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड जेव्ही यांची टेंडर किंमत ५ हजार ६१२.६१ कोटी होती. यात ९३६.४५ कोटींची वाढ झाली.
----------
पॅकेज ३
लार्सन अँड टुब्रोची टेंडर किंमत १ हजार १३.७९ कोटी होती. यात २३२.३७ कोटींची वाढ झाली.
----------
पॅकेज ४
स्ट्रॉबॅग इन्फ्रास्ट्रक्चर ॲण्ड सेफ्टी सोल्यूशन्स जीएमबीएच जेव्ही यांची टेंडर किंमत ४४९ कोटी होती. यात २३.२४ कोटींची वाढ झाली.