मुंबई (Mumbai) : उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत सात शासकीय इमारतीच्या बांधकामांना उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली. या कामांवर सुमारे ११०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे.
मंत्रालयात मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीची बैठक झाली. यावेळी वित्त, नियोजन, विधी व न्याय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, उच्च व तंत्र शिक्षण, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई, विज्ञान संस्थेतील आण्विक व विकिरण प्रयोगशाळा इमारत बांधकामासाठी २४.२५ कोटी; सावित्रीबाई फुले महिला छात्रालय, मुंबई वसतिगृह बांधकामासाठी ८९.५२ कोटी; वांद्रे (मुंबई) येथील सर ज. जी. कला संस्थेच्या कला वसतिगृह व वास्तुशास्त्र वसतिगृह इमारत बांधकामासाठी १९९.७३ कोटी; शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ५९.२६ कोटी रुपये या बांधकामांना मान्यता देण्यात आली.
तसेच, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील महर्षि कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाच्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामास ५४७.२७ कोटी; नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर या संस्थेसाठी आवश्यक विविध बांधकामासाठी १७४.७४ कोटी रुपये; तंत्रनिकेतन वांद्रे येथील मुला - मुलींचे वसतिगृह इमारत बांधकाम अशा एकूण सात प्रकल्प बांधकामांस मान्यता देण्यात आली आहे. यासाठी सुमारे ११०० कोटी रुपये पेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे, असेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.