मुंबई (Mumbai) : निधी अभावी रखडलेल्या मुंबई महानगरातील महत्त्वकांक्षी प्रकल्पांना तब्बल ३१ हजार कोटींच्या कर्जाला मंजुरी मिळाल्याने या सर्व प्रकल्पांना गती मिळणार आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून (पीएफसी) या कर्जाला मंजुरी मिळाली असून यासंदर्भात एमएमआरडीएसोबत कर्ज करार देखील नुकताच करण्यात आला आहे. मुंबई, ठाण्याची वाहतूककोंडी सोडवण्यासाठी हे प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहेत. (Mumbai, Thane Traffic News Update)
मुंबई आणि ठाणे शहरात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असते. ठाण्यातून मुंबईत आणि मुंबईतून ठाण्यात दररोज खाजगी वाहनांनी प्रवास करणार्या नागरिकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडत असल्याने नागरिक खासगी वाहनांनी मुंबई ते ठाणे असा प्रवास करत असतात.
ही दोन्ही शहरे एकमेकांना जोडली गेली असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरु असते. परिणामी ठाण्यात आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
वाहतूककोंडी फोडण्यासाठी मेट्रोसारख्या महत्वाकांशी प्रकल्पाची कामे मुंबई आणि ठाण्यात सुरु आहेत. त्याचसोबत मुंबई आणि ठाण्याची वाहतूकककोंडी सोडवण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्पांचे नियोजन देखील करण्यात आले आहे. मात्र निधीच्या अभावी या प्रकल्पांना संथ गतीने सुरु आहेत.
आता हा मार्ग मोकळा झाला असून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, एमएमआरडीएने हाती घेतलेल्या ठाणे बोरिवली भुयारी मार्ग, ठाणे कोस्टल रोडसह ठाण्यातील आठ प्रकल्पांच्या कामासाठी तब्बल 31,673 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे.
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून (पीएफसी) या कर्जाला मंजुरी मिळाली असून यासंदर्भात एमएमआरडीएसोबत कर्ज करार देखील नुकताच करण्यात आला आहे. या प्रकल्पांच्या एकूण किंमतीपैकी 80 टक्के रक्कम 'पीएफसी'कडून कर्ज स्वरुपात दिली जाणार आहे.
उर्वरित 20 टक्के रक्कम एमएमआरडीएला उभारावी लागेल. एमएमआरडीएच्या हिश्श्याची काही रक्कम राज्य सरकारने अनुदान स्वरुपात दिली. त्यामुळे आता या प्रकल्पांना गती मिळणार आहे.
प्रकल्पनिहाय मंजूर निधी -
अ) ठाणे बोरिवली भुयारी मार्ग - 15,071 कोटी
ब) ठाण्यातील उड्डाणपूल, खाडी पूल प्रकल्पांच्या कामासाठी 16,602 कोटी
१) ठाणे खाडी किनारा मार्ग (टप्पा 1)
२) घाटकोपर ते ठाणेपर्यंत पूर्व मुक्त मार्गाचे विस्तारीकरण
३) एनएच 4 ते कटाई नाक्यादरम्यान उन्नत मार्ग
४) कोलशेत ते काल्हेरदरम्यान खाडीपूल आणि जोड रस्ता
५) कासारवडवली, ठाणे ते खारबाव, भिवंडीदरम्यान खाडीपूल
६) कल्याण मुरबाड रोड (पाल्मस वॉटर रिसॉर्ट) ते बदलापूर रोड ते पुणे लिंक रोड व कर्जत आणि कसारा रेल्वे लाईन ओलांडणार्या वालधुनी नदीच्या समांतर, उन्नत रस्त्याचे बांधकाम
७) ठाणे शहरातील आनंदनगर ते साकेतपर्यंत उन्नत मार्ग
८) गायमुख ते पायेगाव दरम्यान खाडीपूल