मुंबई (Mumbai) : मुंबई-नागपूर (Mumbai-Nagpur) समृध्दी महामार्ग प्रकल्पातील इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. आचासंहिता लागू होण्यापूर्वी हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल व्हावा यासाठी उर्वरित काम रात्रंदिवस सुरू आहे. हे काम सप्टेंबरअखेरीस पूर्ण करून शेवटचा टप्पा खुला करण्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे प्रयत्न आहेत. यामुळे आमणे, भिंवडी ते नागपूर हे अंतर केवळ अवघ्या आठ तासांत पूर्ण करता येणार आहे.
मुंबई ते नागपूर असा एकूण ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे, एमएसआरडीसी बांधत आहे. या महामार्गातील ६२५ किमी लांबीचा महामार्ग अर्थात नागपूर – इगतपुरीपर्यंतचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. सध्या इगतपुरी – अमाणे या शेवटच्या ७६ किमी लांबीच्या टप्प्याचे काम सुरु आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास भिवंडी ते नागपूर थेट प्रवास आठ तासांत करता येणार आहे. या शेवटच्या टप्प्यातील ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. हा टप्पा अभियांत्रिकीदृष्ट्या अत्यंत अवघड होता. पण हे काम वेगाने पूर्ण करण्यात आले आहे. तर उर्वरित काम सप्टेंबरअखेर पूर्ण होईल. त्यानंतर तात्काळ हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.
आचासंहिता लागू होण्यापूर्वी हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल व्हावा यासाठी रात्रंदिवस काम सुरू आहे. त्यामुळे सप्टेंबरअखेर १०० टक्के काम पूर्ण होईल, असा विश्वासही गायकवाड यांनी व्यक्त केला. दरम्यान, शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार असला तरी या टप्प्यातील कसारा येथील पुलाची एक बाजू खुली होणार नाही. या बाजूचे बऱ्यापैकी काम पूर्ण होणे शिल्लक आहे. ही बाजू डिसेंबरमध्ये पूर्ण होणार आहे. शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याकरिता डिसेंबरपर्यंत थांबता येणार नाही. त्यामुळे पुलाची जी बाजू सप्टेंबरअखेर पूर्ण होणार आहे, त्या बाजूवरून दुहेरी वाहतूक सुरू करून हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आहे. तसे नियोजनही पूर्ण झाले आहे. त्यामुळे सप्टेंबरपासून नागपूर ते आमणे, भिवंडी प्रवास अतिवेगवान होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे इगतपुरी – आमणे अंतर पार करण्यासाठी सध्या सुमारे अडीच तास लागतात. पण हा टप्पा कार्यान्वित झाल्यास हे अंतर अंदाजे ४० मिनिटात पूर्ण करता येणार आहे.