road Tendernama
टेंडर न्यूज

'या' टेक्नॉलॉजीद्वारे अवघ्या काही मिनिटात बुजवा रस्त्यावरील खड्डे

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : अल्ट्रा फाईन पॉट निक या कंपनीने क्विक सेटिंग सिमेंट टेक्नॉलॉजीचा वापर करुन अवघ्या काही मिनिटात रस्त्यावरील खड्डे बुजविता येऊ शकतात, असे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामध्ये पाणी, खडी आणि सिमेंटचा वापर करण्यात येतो. सिमेंट मध्ये विशिष्ट पद्धतीचे केमिकल मिक्स करण्यात येते. यामुळे या मिश्रणावर पाण्याचा मारा केल्यानंतर ते लगेच सेट होते. यासाठी वाहतूक बंद करण्याची गरज नाही. तसेच यावरुन वाहने गेल्यासही खड्ड्यातील मिश्रण बाहेर पडत नाही. नुकतेच कल्याण शहरातील पश्चिमेतील गुरुदेव हॉटेल रोड व आग्रा रोडवर याचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची खड्ड्यांनी दुरावस्था झाली असून वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. खड्डे बुजवायचे म्हटले की डांबरीकरणासाठी रस्ता वाहतूकीसाठी बंद ठेवा, डांबरीकरण सुकण्यासाठी लागणारा वेळ आदी प्रक्रिया खूप वेळ खाऊ आहे. रस्त्यावरील वाहतूक बंद न करता अवघ्या पाच मिनिटात सिमेंट, खडी व पाण्याचा वापर करत खड्डे बुजविता येतील असा दावा कंपनीने केला आहे. याचे प्रात्यक्षिक शहर अभियंता अर्जुन अहिरे यांच्या उपस्थितीत नुकतेच कल्याण पश्चिमेतील गुरुदेव हॉटेल रोड व आग्रा रोडवर राबिवण्यात आले. खड्ड्यातील हे मिश्रण कशा पद्धतीने टिकते यावरुन कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत हा प्रयोग राबवायचा का याचा विचार केला जाईल अशी माहिती शहर अभियंता अहिरे यांनी दिली.

कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. पावसाळ्यात ही समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते. यावर उपाय योजना म्हणून पालिका प्रशासनाने आत्तापर्यंत विविध प्रयोग राबविले आहेत. सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे खड्डे बुजवून देखील ते तग धरत नव्हते. तसेच डांबरीकरण करावयाचे झाल्यास वाहतुकीसाठी तो रस्ता बंद करणे, डांबर सुकण्यासाठी लागणारा कालावधी आदि प्रक्रीया ही वेळखाऊ आहे. रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजविले जावेत यासाठी पालिका प्रशासन वेगवेगळ्या स्तरावर प्रयोग करत असून अल्ट्रा फाईन पॉट निक कंपनीने अवघ्या पाच मिनिटात सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्यात आलेला रस्त्यावरील खड्डे बुजविता येतील असा दावा केला आहे. खड्ड्यात खडी, सिमेंट टाकण्यात येत असून त्यावर पाण्याचा मारा केल्यास ते अवघ्या काही मिनिटात सेट होत असल्याचे कंपनी कर्मचाऱ्यांनी सांगितले. सिमेंट त्वरीत सेट होण्यासाठी त्यामध्ये काही केमिकलचा मारा करण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

याविषयी पालिकेचे शहर अभियंता अहिरे म्हणाले, अल्ट्रा फाईन पॉट निक या कंपनीने असा दावा केला आहे की, क्विक सेटिंग सिमेंट टेक्नॉलॉजीचा वापर करुन अवघ्या काही मिनिटात रस्त्यावरील खड्डे बुजविता येऊ शकतात. यामध्ये पाणी, खडी आणि सिमेंटचा वापर करण्यात येत आहे. सिमेंट मध्ये विशिष्ट पद्धतीचे केमिकल मिक्स करण्यात आले आहे. यामुळे या मिश्रणावर पाण्याचा मारा केल्यानंतर ते लगेच सेट होते. यासाठी वाहतूक बंद करण्याची गरज नाही. यावरुन वाहने गेल्यासही खड्ड्यातील मिश्रण बाहेर पडणार नाही असे सांगितले आहे. याचे प्रात्यक्षिक आम्ही करुन पाहिले आहे. त्यामुळे खड्डे त्वरित बुजविले जात असतील तर त्याचा विचार केला जाईल. सिमेंटच्या रस्त्यावर हे प्रात्यक्षिक राबविले असून, डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर देखील हे उपायकारक ठरते का हे पाहिले जाईल असे शहर अभियंता अहिरे यांनी सांगितले.