मुंबई (Mumbai) : मुंबईतील ४०० किमीच्या सिमेंट कॉंक्रिट रस्त्यांसाठी मुंबई महापालिकेने नव्याने ६,०७९ कोटींचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. नव्या टेंडरच्या बजेटमध्ये सुमारे २०० कोटींची वाढ झाली आहे. दर्जेदार आणि टिकाऊ रस्त्यांसाठी परदेशात वापरल्या जाणाऱ्या पोरस सिमेंट वापराची अट नव्या टेंडरमध्ये घालण्यात आली आहे. गेल्यावेळी मुंबई महापालिकेने ५,८०० कोटींचे टेंडर मागवले होते. मात्र, कंत्राटदारांकडून प्रतिसाद न मिळाल्याने ते टेंडर रद्द करण्यात आले होते.
मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते करण्यावर महापालिका प्रशासनाचा जोर आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत सुमारे २ हजार किमीचे रस्ते आहेत. यामधील सुमारे १ हजार किमी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्णही झाले आहे. महापालिकेने याआधी मागवलेले टेंडर २०१८ च्या दरांनुसार होते. मात्र आता चार वर्षांच्या कालावधीत सिमेंट, लोखंड, स्टील आणि इतर आवश्यक सर्वच कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमतींमुळे नव्या टेंडर प्रक्रियेत याच रस्त्यांच्या कामाच्या कंत्राटाची रक्कम सुमारे १७ टक्क्यांनी वाढल्याचा खुलासा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे संपूर्ण कामाचा खर्च २०० कोटींनी वाढला आहे.
शहर आणि दोन्ही उपनगरातील ४०० किलोमीटरचे रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे करण्यासाठी तब्बल ६,०७९ कोटींची टेंडर काढण्यात आली आहेत. या टेंडरमध्ये परदेशात वापरणारे पोरस सिमेंट वापराची अट घालण्यात आली आहे. याशिवाय टेंडरच्या इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महापालिकेकडून अतिशय कडक अटी व शर्तींमुळे याआधीच्या टेंडर प्रक्रियेत अवघ्या सात कंपन्यांनी सहभाग घेतला होता. परंतु अत्यल्प प्रतिसादामुळेच महापालिकेने ही टेंडर प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला.
असा होणार खर्च -
शहर विभाग - 1233 कोटी 11 लाख 19 हजार 021
पूर्व उपनगर - 846 कोटी 17 लाख 61 हजार 299
पश्चिम उपनगर
- झोन : 3 - 1223 कोटी 84 लाख 83 हजार 230
- झोन : 4 - 1631 कोटी 19 लाख १८ हजार 564
- झोन : 7 - 1145 कोटी 18 लाख 92 हजार 388
किती किलोमीटर रस्त्यांची कामे होणार?
पश्चिम उपनगर - 253.65 किमी
पूर्व उपनगर - 70 किमी
शहर विभाग - 72 किमी