मुंबई (Mumbai) : जी-२० (G-20) चे परिषदचे अध्यक्षपद यंदा भारताला मिळाले आहे. त्या अनुषंगाने मुंबईमध्ये विविध कार्यक्रम आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले आहे. यावर मुंबई महापालिकेने तब्बल ३५ कोटी रुपये खर्च केले आहेत. या कामांसाठी महापालिकेने कधी टेंडर काढली, किती जणांनी टेंडर भरली, यासाठी कोणी किती रक्कम भरली होती, अंतिमतः कोणाला काम देण्यात आले. याची कोणतीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. हा पैसा करदात्या नागरिकांचा असल्याने तो कुठे आणि कसा खर्च केला याची माहिती उघड करावी, अशी मागणी महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे.
जी-२० परिषदेचे 2023 चे अध्यक्षपद भारताकडे आहे. यानिमित्त महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह नागपूर, पुणे आणि औरंगाबाद येथे विविध बैठका होणार आहेत. मुंबईत 12 ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीत विविध देशांचे प्रतिनिधी येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. जी-२० साठी मुंबई महापालिकेने मुंबईमध्ये केलेले सुशोभीकरण आणि मुंबईमधील प्रदूषण होऊ नये म्हणून १० दिवस बांधकाम थांबवण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. यासंदर्भात रवी राजा म्हणाले की, महापालिकेकडून करण्यात येणारा खर्च हा करदात्या नागरिकांच्या पैशातून केला जातो. ३५ कोटी रुपये खर्च करताना कधी टेंडर काढली, कोणाला काम देण्यात आले. किती जणांनी टेंडर भरल्या, यासाठी कोणी किती रक्कम भरली होती याची कोणतीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. याबाबतची माहिती लोकांना कळावी म्हणून महापालिकेच्या वेबसाईटवर ती टाकायला हवी होती, पण तीही टाकण्यात आलेली नाही, असेही रवी राजा म्हणाले.
जी-२० साठी मुंबईत आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आहे. त्यांना इथली झोपडपट्टी दिसू नये म्हणून पडदे लावण्यात आले आहेत. इव्हेंटच्या ठिकाणी जे झेंडे लावण्यात आले आहेत, त्या एका झेंड्यासाठी महापालिकेने २४ हजार रुपये मोजले आहेत. त्याचबरोबर मुंबईत प्रदूषणाचा टक्का वाढू नये, म्हणून बांधकामे थांबविण्यात आली आहेत. डेब्रिज वगैरे घेवून जाणाऱ्या गाड्या सोडल्या जावू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. जी-२० साठी आलेल्या पाहुण्यांना प्रदूषणाचा त्रास होवू नये म्हणून असे निर्बंध घातले गेले आहेत. मग आम्ही माणसं नाही का? आम्ही इथे कायम राहणारी माणसं आहोत आम्ही प्रदूषण सहन करायचे का, त्यासाठी तुम्ही काही करणार नाही, असा सवालही रवी राजा यांनी उपस्थित केला आहे.