Mumbai

 

Tendernama

टेंडर न्यूज

होऊ दे खर्च! निवडणुकीच्या तोंडावर मुंबईची सुपरफास्ट रंगरंगोटी

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, आता निवडणुकीच्या तोंडावर शहराच्या रंगरंगोटीचा मोसम सुरु झाला आहे. रस्त्यांवरील दुभाजकांची रंगरंगोटी करण्याबरोबरच या दुभाजकांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. या कामाने आता वेग घेतला आहे. त्यासोबत प्रमुख रस्त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या भिंतीवरही कलात्मक चित्रं रंगवून सुशोभीकरण करण्यात येत आहे.

रस्त्यांवरील दृश्यमानता वाढावी, पर्यायाने वाहनचालकांना सुरक्षितरित्या वाहन चालविता यावे आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, रस्ते परिसरांचे सुशोभीकरण व्हावे या दृष्टीने वेगवेगळ्या उपाययोजना करण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी सर्व विभाग कार्यालयांना सूचना केल्या होत्या. ज्या रस्त्यांवर मध्यवर्ती दुभाजक आहेत त्यांची स्वच्छता करुन नव्याने रंगरंगोटी करणे, दुभाजक अस्तित्वात नसल्यास शक्य त्या रस्त्यांवर दुभाजक बांधणे, दुभाजकांमध्ये हिरवळ वा फुलझाडांची लागवड करणे, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण करणे, प्रमुख रस्त्यांवरील आजूबाजूच्या भिंतीवर कलात्मक रंगरंगोटी करणे, चित्रं रेखाटणे अशी कामे हाती घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार सध्या मुंबईतील विविध भागांमध्ये ही कामे वेगाने सुरु आहेत.

विभाग कार्यालयांच्यावतीने ही कामे हाती घेण्यात आली आहेत. प्रमुख रस्त्यांवरील मध्यवर्ती दुभाजक व पदपथाच्या कडेला असणारे दगड (कर्ब स्टोन) सुद्धा रंगवण्यात येत आहेत. ही सर्व कामे नियमित स्वरुपाची आहेत. आवश्यक त्या जागी, आवश्यक त्या वेळी ही कामे केली जातात. असे असले तरी सध्या संपूर्ण मुंबईत एकाचवेळी मोठ्या स्तरावर ही कामे होत आहेत, असा दावाही प्रशासनाकडून करण्यात आला. या कामांचा मुख्य उद्देश हा सुशोभीकरणासोबतच रस्त्यावरील सुरक्षितता वाढविणे आहे. रंगरंगोटीमुळे दृश्यमानता वाढून वाहनचालकांना सुरक्षितरित्या वाहने चालविण्यास मदत होईल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल. तसेच नागरिकांनाही पदपथांवरुन सुरक्षितपणे चालता येईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

तसेच आदित्य ठाकरे हे वेळोवेळी बैठका घेऊन मुंबईतील सुशोभीकरणाच्या कामाचा आढावा घेत आहेत. मुंबई उपनगरातील चार संकल्प उद्यान, वांद्रे येथे ट्री वॉक तसेच उपनगरातील महत्वाच्या चौकांचे लॅन्डस्केपिंगही करण्यात येणार आहे. यासाठी टेंडर प्रक्रिया सुरु आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत राज्य सरकारने या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. राज्य सरकारच्या निधीतून हे प्रकल्प होणार असताना प्रभागामध्येही लहान मोठ्या गल्ल्यांचे सुशोभीकरण सुरु करण्यात आले. वांद्रे कलानगर येथे पदपथाच्या सुशोभीकरण बरोबर वाहतुकीच्या नियोजनासाठी आधुनिक उपाय केले जात आहेत. तर, वरळीतील प्रसिध्द जंबोरी मैदानाच्या सुशोभीकरण करण्यात आले. दादर येथे शिवाजी पार्क मैदानावर रेन वॉटर हार्वेस्टिंगाचा प्रकल्प उभारला जात आहे. तर, गिरगाव आणि दादर चौपाटीवर व्ह्यूइंग गॅलरी उभारली जात आहे. जिल्हा नियोजन समिती मार्फतही शिवसेनेच्या नगरसेवकांना प्रभागातील सुशोभीकरणासाठी निधी पुरवण्यात आला आहे.