Mumbai Tendernama
टेंडर न्यूज

चांगभल! टेंडर न काढताच मुंबई पालिका मोजणार कंत्राटदाराला २७ कोटी

हिंदमाताच्या भूमिगत टाकीतील पाणी प्रमोद महाजन उद्यानापर्यंत नेणार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेचा (Mumbai Municipal Corporation) आणखी एक अजब निर्णय समोर आला असून, कोणतेही टेंडर (Tender) न काढता तब्बल २७ कोटी रुपये थेट कंत्राटदारालाच (Contractor) कामासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिंदमाता (Hindmata) येथील भूमिगत टाकीत साठवलेले पाणी दादर (Dadar) पश्‍चिमेकडील प्रमोद महाजन उद्यानापर्यंत नेण्यासाठी मायक्रोटनलिंग पद्धतीने पर्जन्यवाहिनी तयार करण्यात येत आहे. हे काम महापालिका प्रशासनाने टेंडर न काढताच लालबाग येथे मायक्रोटनलिंगचे (Microtunneling) काम करणाऱ्या कंत्राटदारला दिले आहे. या कामासाठी पालिका २६ कोटी ८२ लाख रुपये खर्च करणार आहे.

हिंदमाता, परळ नाका परिसरातील पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका भूमिगत टाक्‍या बांधत आहे. समुद्राला भरती असताना पावसाचे पाणी या टाक्‍यांमध्ये साठवण्यात येणार आहे. यासाठी दादर पश्‍चिमेकडील प्रमोद महाजन कला पार्क येथे टाकी बांधण्यात येणार आहे. हिंदमाता येथून महाजन कलापार्कपर्यंत पर्जन्यवाहिनी ही रेल्वे मार्गातून जाणार असल्याने पालिकेने हे काम मायक्रोटनलिंग पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला; मात्र यासाठी टेंडर मागवून कंत्राटदाराची नियुक्त करण्याऐवजी पालिकेने लालबाग पोलिस चौकी ते श्रावण यशवंते चौकापर्यंत मायक्रोटनलिंग पद्धतीने पर्जन्यवाहिन्या बांधणाऱ्या कंत्राटदारालाच हे काम दिले.

सर्व खर्च ५३ कोटींवर
लालबाग येथील मायक्रो टनलिंगच्या कामासाठी पालिका २७ कोटी ९३ लाख रुपयांचा खर्च करणार होती. आता हिंदमाता ते महाजन पार्कपर्यंतच्या वाढीव कामासाठी पालिका २६ कोटी ८२ लाख रुपयांचा वाढीव खर्च करत आहे. तसा प्रस्ताव गुरुवारी (ता. १९) होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. ही दोन्ही कामे मिळून सर्व खर्च ५३ कोटींवर पोहोचला आहे.

वाढीव दराने काम
लालबाग येथील मायक्रो टनलिंगच्या कामांसाठी पालिकेने २४ कोटी ४० लाख रुपयांचा खर्च अंदाजित केला होता; मात्र निविदा प्रक्रियेत लघुत्तम असलेल्या कंत्राटदाराने हे काम २७ कोटी ९३ लाखात करण्याची तयारी दाखवली. हे काम १४ टक्के वाढीव दराने होत होते. त्यामुळे पालिकेने अतिरिक्त काम या कंत्राटदाराला देताना अंदाजित दरापेक्षा वाढीव दराने काम करण्याची तयारी दाखवली.