school tendernama
टेंडर न्यूज

मुंबई महापालिकेने 'करून दाखवलं'; बंद शाळांवर ९० कोटींचा खर्च

तीन वर्षाच्या कंत्राटाला अतिरिक्त अडीच वर्षांची मुदतवाढ

टेंडरनामा ब्युरो

मुंबई : मुंबई महानगरपालिकेत आता पुन्हा विना टेंडर कामे करुन घेण्याचा प्रकार सुरु झाला आहे. शाळांच्या नियमित देखभालीसाठी तीन वर्षाच्या कंत्राटाला अतिरिक्त अडीच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे हा खर्च 209 कोटीवरुन तब्बल 368 कोटींवर पोहोचला आहे. महत्वाचे म्हणजे, कोविड काळात शाळा बंद असतानाही महापालिकेने यासाठी 90 कोटी रुपयांचा खर्च केला आहे.

मुंबई महानगरपालिका शाळांची नियमित स्वच्छता, सुरक्षितता, विद्युत साधने, उपकरणांची देखभाल यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करते. हे कंत्राट तीन वर्षांचे असते. मात्र, पाच वर्षांपूर्वी पालिकेने नियुक्त केलेल्या कंत्राटाची मुदत अडीज वर्षांपूर्वी संपली. पण,कंत्राटदारांची नियुक्ती न होऊ शकल्याने जुन्याच कंत्राटदारांना मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत वाढवत अडीच वर्षांचा काळ लोटला. यात, 90 कोटी रुपयांचा खर्च कोविड काळातील आहे.

मार्च 2021 मध्ये याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे प्रशासनाने मांडला होता. मात्र स्थायी समितीकडून आक्षेप घेण्यात आल्याने हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठविण्यात आला होता. आयुक्तांच्या अभिप्रायासह पुन्हा मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. यामध्ये, टेंडर प्रक्रियेत विलंब झाल्याचे मान्य करण्यात आले आहे. तसेच, कोरोना कालावधीत शाळा विद्यार्थ्यांसाठी बंद असल्या तरी शाळांची स्वच्छता, देखभाल, सुरक्षितता आदी कामे सुरुच होती असे प्रशासनाकडून नमुद करण्यात आले आहे. मूळ कंत्राटकामाची किंमत 209 कोटी 78 लाख रुपये असताना त्यात 159 कोटी 10 लाख रुपयांची वाढ होऊन ते कंत्राट 368 कोटी 89 लाख रुपयांवर गेले आहे. हा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीने राखून ठेवला आहे.

शहर, पश्चिम उपनगर व पूर्व उपनगरात प्रत्येकी एक अशा तीन ठेकेदारांची 18 मार्च 2016 ते 17 मार्च 2019 या तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने नवीन ठेकेदार न नेमता जुन्या ठेकेदारांना काही महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवली असता केवळ दोनच ठेकेदार आल्याने ती प्रक्रिया रद्द करण्यात आली, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.