BEST Tendernama
टेंडर न्यूज

ई-बस टेंडरपूर्वीच सुरु झाल्या घोटाळ्याच्या तक्रारी;बीएमसी म्हणते..

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ईलेक्ट्रिक बसबाबत राबविण्यात येत असलेली टेंडर प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. टेंडर धारकांना या प्रक्रियेत सहभागी होण्याची अजूनही संधी उपलब्ध आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. इलेक्ट्रिक बसेसच्या टेंडरमध्ये शिवसेनेवर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला आहे. इलेक्ट्रिक बस टेंडर प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी, अंतिम मुदतीच्या दीड तास आधी नियम बदलले गेल्याचा आरोपही साटम यांनी लावला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने यासंदर्भात वस्तुस्थिती मांडली आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने राबविण्यात येत असलेली ईलेक्ट्रिक बसबाबतची टेंडर प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. टेंडरधारक कंपन्यांच्या विनंतीनुसार त्यांच्यासोबत बैठका घेऊन जागतिक पातळीवरच्या जास्तीत जास्त व्यवसाय संस्थांना या टेंडर प्रक्रियेत सहभाग घेता यावा यादृष्टीने बेस्टने ही प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ केली आहे. जेणेकरुन चांगले स्पर्धात्मक दर प्राप्त होतील. आणि जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वातानुकूलित बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतील.

यासंदर्भात व्यापक प्रसिद्धी देण्यात आली आहे. तसेच इच्छूक कंपन्यांना ईमेलद्वारे कळविण्यात आले आहे. टेंडर धारकांना या प्रक्रियेत सहभागी होण्याची अजूनही संधी उपलब्ध आहे, असे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने केले आहे. त्यामुळे या अनुषंगाने होत असलेले आरोप हे तथ्यहीन आणि चुकीचे असल्याचा खुलासा मुंबई महापालिकेने केला आहे.