मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिका वांद्रे पश्चिम येथील भाभा रुग्णालयाजवळ दहा मजली स्वतंत्र कर्करोग रुग्णालय बांधणार आहे. १६५ खाटांच्या या सर्व सुविधांयुक्त रुग्णालयाच्या बांधकामासाठी २१३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या रुग्णालयाचे बांधकाम आगामी ३६ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे.
कर्करोग रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मुंबईत असलेल्या 'टाटा' रुग्णालयात मुंबई आणि मुंबई बाहेरील रुग्ण उपचारासाठी रुग्ण येत असतात. त्यामुळे या रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी होते. सध्या मुंबईत कॅन्सरसेवेचा मुख्य भार परळ आणि खारघर येथील टाटा मेमोरियल सेंटर्सद्वारे उचलला जातो. मुंबई सेंट्रलजवळील नायर रुग्णालय हे रेडिएशन थेरपी देणारे एकमेव नागरी केंद्र आहे. तसेच केईएम रूग्णालयात काही खाटा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे टाटा रुग्णालयाच्या धर्तीवर मुंबई महापालिकेचे सर्व सेवा सुविधांयुक्त कर्करोगावरील स्वतंत्र रुग्णालय वांद्र्यात उभारले जात आहे. वांद्रे पश्चिम येथील आर. के. पाटकर रोडवरील कर्करोग रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे आराखडे तयार केले असून यात १० मजल्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये तळघर १ ते ८ मजले रुग्णालय असेल आणि ९ व १० मजल्यावर कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था असेल. या कामासाठी एएनसीपीएल-शेठ या संयुक्त भागीदार कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी विविध करांसह २१३ कोटी रूपये खर्च करण्यात येत आहे.
रुग्णालयात केमोथेरपीपासून ब्रॅकीथेरपी आणि रेडिएशनपर्यंत, अतिदक्षता विभागासह संपूर्ण कर्करोगाची काळजी घेणारे हे अद्ययावत रुग्णालय असेल. या रुग्णालयामुळे गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. सुमारे १३ हजार चौरस मीटरच्या बांधकाम क्षेत्रासह दोन तळघर असतील. रेडिएशन थेरपीसाठी दोन बंकर खोल्या असलेल्या या इमारतीत १२ ओपीडी वॉर्ड, बायोकेमिस्ट्री, हिस्टोपॅथॉलॉजी, हेमॅटोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी यांसह पाच प्रयोगशाळा असणार आहेत. डायग्नोस्टिकमध्ये, मॅमोग्राफी आणि पीईटी-सीटी युनिट्सदेखील असतील. रुग्णालयाच्या इमारतीत लेक्चर हॉल, सेमिनार हॉल, रक्तपेढी आणि आयसोलेशन असेल. रुग्णांच्या नातेवाइकांसाठी वसतिगृहासारखी सुविधा निर्माण केली जाणार आहे. वांद्रे येथील भाभा रुग्णालयासमोर असणाऱ्या महापालिकेच्या भूखंडावर स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटल असावे, अशी कल्पना स्थानिक आमदार व मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेकडे मांडली होती.