Mumbai Metro Tendernama
टेंडर न्यूज

मुंबई परिसरात आणखी ११ नवे मेट्रो मार्ग; ५०० किमीचे जाळे उभारणार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) माध्यमातून मुंबई महानगर क्षेत्रात पुढील सुमारे वीस वर्षांच्या वाहतुकीचे नियोजन (Transport Planning) लक्षात घेऊन ५०० किलोमीटरचे मेट्रो (Metro) जाळे उभारण्यात येणार आहे. सध्या काम सुरू असलेल्या ३३७ किमीच्या १४ मेट्रो मार्गिका अपुऱ्या पडणार असल्याने आणखी ११ मार्गिका तयार करण्याचे नियोजन आह़े. त्यामुळे आगामी काळात एकूण २५ मेट्रो मार्गिकांच्या रुपाने मुंबई खऱ्या अर्थाने मेट्रो सिटी (Metro City) होणार आहे.

वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी 'एमएमआरडीए'कडून २००८ ते २०२१ दरम्यानच्या वाहतुकीचा सर्वंकष अभ्यास अहवाल तयार करण्यात आला होता. या अभ्यासानुसार मुंबई महानगर क्षेत्रात मेट्रो मार्गाची शिफारस करण्यात आली होती. 'एमएमआरडीए'ने ३३७ किलोमीटरचे मेट्रो मार्गाचे जाळे उभारण्याचा निर्णय घेत १४ मार्गिका हाती घेतल्या. त्यातील ११.४० किमीचा मेट्रो १ (वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर) मार्ग ८ जून २०१४ ला सेवेत दाखल झाला आहे. आता गुढीपाडव्याच्या दिवशी मेट्रो २ अ (दहिसर ते डी. एन. नगर) आणि मेट्रो ७ (दहिसर ते अंधेरी) मार्गिकेतील एकत्रित २०.७३ किमीचा दहिसर ते आरे टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला आहे.

या मार्गातील दुसरा टप्पा ऑगस्टमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी २ ब, ३,४,५,६,९ मार्गिकेची कामे सुरू असून, १०, ११, १२ या मार्गिकांची कामे लवकरच सुरू होणार आहे. उर्वरित मार्गिका येत्या काळात मार्गी लागणार असून, सध्या काम सुरू असलेल्या मार्गिका २०२६ पर्यंत सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. उर्वरित मार्गिका २०३१ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आह़े.

'एमएमआरडीए'ने नुकताच सर्वंकष वाहतूक अभ्यास -२ हा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात २०४१ मधील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी ३३७ किमीच्या मेट्रो मार्गिकांचा विस्तार ४८७ किमीपर्यंत वाढविण्याची शिफारस करण्यात आली आहे. हे मार्ग कुठे आणि कसे असतील, याची आखणी करण्यात आली आहे. त्यानुसार अतिरिक्त ११ मार्गिका निश्चित करण्यात आल्या आहेत. जवळपास सर्व नवीन मार्गिका नवी मुंबई आणि ठाण्यातील आहेत. त्यातील काही मार्गिकांचे काम, तर काहींचे नियोजन संबंधित पालिकांकडून सुरू असल्याची माहिती 'एमएमआरडीए'तील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

'सर्वंकष वाहतूक अभ्यास -२' अहवालानुसार ३२२.५ किमीच्या मेट्रो मार्गिका २०२६-२०२७ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. २०२७ ते २०३१ दरम्यान १००.७ किमीचे जाळे पूर्ण करण्यात येणार असून, त्यात मेट्रो ११, १९, १३, २०,२१, २२ मार्गिकांचा समावेश आहे. २०३२ ते २०४१ दरम्यान ६४.१ किमीचे मेट्रो जाळे पूर्ण करण्यात येणार असून, त्यात मेट्रो २३, २४ आणि २५ मार्गिकांचा समावेश असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

२०२६ ते २०४१ दरम्यान पूर्ण होणाऱ्या मार्गिका -

* मेट्रो १५ : बेलापूर-तळोजा-पेंधर -११.३ किमी - काम सुरू- २०२६ मध्ये पूर्ण

* मेट्रो १६ : पेंधर ते एमआयडीसी- २ किमी -काम सुरू-२०२६ मध्ये पूर्ण

* मेट्रो १७ : एमआयडीसी ते खांदेश्वर-७.२ किमी-बृहत आराखडा पूर्ण-२०२६ मध्ये काम पूर्ण

* मेट्रो १८ : ठाणे रिंग मेट्रो -२८.७ किमी -बृहत आराखडा पूर्ण-२०२६ मध्ये काम पूर्ण

* मेट्रो १९ : प्रभादेवी-शिवडी-नवी मुंबई विमानतळ (मुंबई पारबंदर प्रकल्प)-२६.५ किमी -आराखडा पूर्ण-२०३१ मध्ये पूर्ण

* मेट्रो २० : खांदेश्वर ते नवी मुंबई विमानतळ - ३.७ किमी - बृहत आराखडा पूर्ण - २०३१ पर्यंत काम पूर्ण

* मेट्रो २१ : मुंबई पारबंदर प्रकल्प ते जांभूळपाडा - ५ किमी - २०३१ मध्ये काम पूर्ण

* मेट्रो २२ : ठाणे ते जुईनगर - २०.६ किमी - प्रस्तावित - २०३१ मध्ये काम पूर्ण

* मेट्रो २३ : कासारवडवली ते अंबरनाथ - ४१.४ किमी - प्रस्तावित - २०४१ मध्ये काम पूर्ण

* मेट्रो २४ : खांदेश्वर ते तरघर - ९.९ किमी - सिडकोकडून प्रस्तावित - २०४१ मध्ये काम पूर्ण

* मेट्रो २५ : जुईनगर ते नवी मुंबई विमानतळ - १२.८ किमी - सिडकोकडून प्रस्तावित - २०४१ मध्ये काम पूर्ण