Ashwini Bhide Tendernama
टेंडर न्यूज

Mumbai Metro : मुंबई मेट्रोच्या विस्ताराची घोषणा; काय म्हणाल्या अश्विनी भिडे?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई मेट्रो ३ (Mumbai Metro 3) कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्गिकेचा कफ परेड ते नेव्ही नगर असा विस्तार करण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनने घेतला आहे. या विस्तारीत मार्गिकेसाठी सुमारे अडीच हजार कोटींचा निधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना आरे ते नेव्ही नगर असा थेट प्रवास करता येणार आहे.

कफ परेड ते नेव्ही नगर अशा विस्तारीत मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल नुकताच पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी दिली आहे. या अहवालानुसार २.५ किमीने कफ परेड ते नेव्ही नगर असा मेट्रो ३ चा विस्तार होणार आहे. तर यात नेव्हीनगर या एकमेव मेट्रो स्थानकाचा समावेश असणार आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च (टीआयएफआर) जवळ हे स्थानक असणार आहे. या विस्तारीत मार्गिकेसाठी अंदाजे २५०० कोटींचा निधी लागण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पाचे काम सुरू झाल्यापासून काम पूर्ण होण्यास पाच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०३०-३१ मध्ये मुंबईकरांना आरे ते नेव्ही नगर असा थेट प्रवास करता येणार आहे.

मेट्रो ३ मार्गिकेच्या ३३ किमीच्या कुलाबा ते सीप्झ या संपूर्ण भुयारी मार्ग प्रकल्पाच्या कामाला २०१६ मध्ये सुरुवात झाली होती. या मार्गावर एकूण २७ मेट्रो स्थानके आहेत. आता मेट्रो ३ चा कफ परेडपासून नेव्हीनगरपर्यंत २.५ किमीने विस्तार होणार असून या दरम्यान एकमेव नेव्ही नगर मेट्रो स्थानक असणार आहे. लवकरच या आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर २०२५ मध्ये या विस्तारीत मार्गिकेच्या कामाला सुरुवात होणार आहे.

मुंबई मेट्रो ३ हा मेट्रोचा पहिला टप्पा पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्यातील भुयारीकरण पूर्ण झाले आहे. मार्गावरील स्थानकांची कामेही जवळपास ९८ टक्के पूर्ण झाली असून चार स्थानके जवळपास सज्ज झाली आहेत.