Ambani Metro Tendernama
टेंडर न्यूज

Mumbai Metro : अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्राची मेट्रो-1 मधून का झाली गच्छंती?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ (Mumbai Metro-1) मार्गिका ताब्यात घेण्याचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (MMRDA) मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडच्या (MMOPL) कर्जाची परतफेड करण्याची हमी एमएमआरडीएने दिली असून, 'मेट्रो-१' मार्गिका ताब्यात घेण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे.

'मेट्रो-१' या मार्गिकेची उभारणी खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर रिलायन्स इन्फ्रा अर्थात एमएमओपीएलकडून करण्यात आली आहे. यात ७४ टक्के हिस्सा एमएमओपीएल (रिलायन्स इन्फ्रा) तर २६ टक्के हिस्सा एमएमआरडीएचा आहे. मार्गिकेची मालकी आणि देखभाल, संचलन जबाबदारी एमएमओपीएलकडे आहे.

दरम्यान ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासून आर्थिक तोट्यात आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी एमएमओपीएलने तिकीट दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. पण ही वाढ करता आली नाही. त्यामुळे तोटा वाढतच आहे. एमएमओपीएलने आपला हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आणि २०२० मध्ये यासंदर्भाचे पत्र राज्य सरकारला पाठविले होते. त्यानंतर हा हिस्सा एमएमआरडीएने विकत घेण्याचे ठरविले. त्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आणि आता या प्रक्रियेने वेग घेतला आहे.

'मेट्रो-१' मार्गिका ताब्यात घेण्यात एक मोठा अडथळा होता तो म्हणजे एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीच्या याचिकेचा. एमएमओपीएलने सहा बँकांकडून १७११ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. यात एसबीआय व आयडीबीआय बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा ही समावेश होता.

या दोन्ही बँकांनी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे धाव घेत एमएमओपीएलविरोधात याचिका दाखल केली होती. पण आता एमएमआरडीएने ही मार्गिका ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून आतापर्यंत १७५ कोटी रुपये कर्जाची परतफेड केल्याने व कर्ज फेडीची हमी दिल्याने एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली काढण्यात आली. आता 'मेट्रो-१' मार्गिका ताब्यात घेण्याचा एमएमआरडीएचा मार्ग मोकळा झाला आहे.