Mumbai Local Tendernama
टेंडर न्यूज

Mumbai Local Train : मोठी बातमी; बोरिवली ते विरार दरम्यान लोकलचा वेग वाढणार! काय आहे कारण?

26 किमीच्या दोन रेल्वे मार्गिकांच्या विस्तारीकरणाचा नारळ लवकरच; २,१८४ कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : बोरिवली ते विरार २६ किलोमीटर लांबीच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी २,१८४ कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे. या मार्गामुळे लोकलची संख्या वाढणार आहे.

सध्या मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान पाच मार्गिका आहेत आणि सहाव्या मार्गाचे काम सुरू आहे, तर बोरिवली ते विरारदरम्यान चार मार्गिका आहेत. लवकरच पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाचा नारळ फुटणार आहे.

या प्रकल्पासाठी कांदळवनातील झाडे तोडण्याची परवानगी मिळावी यासाठी पश्चिम रेल्वेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीनंतर न्यायालयायाने निकाल राखून ठेवला होता, तो निकाल न्यायालयायाने नुकताच जाहीर केला आहे. या रेल्वे मार्गिकेसाठी २,६१२ तिवरांची झाडे तोडण्यासाठी उच्च न्यायालयायाने परवानगी दिली आहे.

पश्चिम रेल्वेवरील बोरिवली-विरार स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या बांधकामामुळे लोकल सेवेवरील मर्यादा दूर होईल, तसेच इंधनाची बचत होईल, असे सांगत उच्च न्यायालयाने मार्गिकेच्या आड येणारी २,६१२ खारफुटी तोडण्यास परवानगी दिली.

मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने ही परवानगी देताना नव्या रेल्वे मार्गिकेमुळे इंधनाची बचत होईल आणि त्यामुळे प्रदूषणाला आळा बसेल असे निरीक्षण नोंदवले. न्यायालयायाच्या या निर्णयामुळे या मार्गिका विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सार्वजनिकदृष्ट्या हिताचा आहे आणि त्याचे महत्त्वपूर्ण पर्यावरणीय फायदे आहेत, असेही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

खरंतर खारफुटी तोडण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. परंतु सार्वजनिक हिताच्या प्रकल्पासाठी खारफुटी तोडायची असल्यास उच्च न्यायालयाच्या परवानगीची अट आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती, आता बोरिवली-विरार स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.