Bullet Train Tendernama
टेंडर न्यूज

Bullet Train : बुलेट ट्रेन सुसाट; मार्गातील 'हा' मोठा अडथळा दूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या (Mumbai-Ahmedabad Bullet Train) मार्गात गोदरेज कंपनीच्या याचिकेमुळे निर्माण झालेला अडथळा अखेर दूर झाला. उच्च न्यायालयाचे न्या. आर. डी. धनुका आणि न्या. मिलिंद साठ्ये यांच्या खंडपीठाने गोदरेजची याचिका फेटाळून लावली. या निर्णयाला स्थगिती देण्याची गोदरेज कंपनीची विनंतीही न्यायालयाने फेटाळली.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला राष्ट्रीय महत्व आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेत कोणतीही अनियमितता आढळत नाही. बुलेट ट्रेन प्रकल्प हा देशाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. प्रकल्पाला आधीच विलंब झाला आहे. त्यात आणखी उशीर करणे योग्य नाही. असे स्पष्ट करत खंडपीठाने गोदरेज कंपनीचे वाढीव भरपाईसाठीचे अपील फेटाळले. हा प्रकल्प जनहितार्थ आणि देशासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. तो एकासाठी रखडून चालणार नाही. यात सार्वजनिक हित महत्वाचे आहे. बुलेट ट्रेन प्रकल्प हा पायाभूत सुविधांचा आणि राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा सार्वजनिक प्रकल्प आहे. त्यामुळे न्यायालय विशेषाधिकाराचा वापर करू शकत नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रातील १०० टक्के भूसंपादन झाले असून, फक्त विक्रोळीतील गोदरेजच्या जागेचा तिढा निर्माण झाला होता. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्याचा राज्याचा आदेश आणि बुलेट ट्रेनसाठी विक्रोळीतील जागेकरता राज्य सरकार देत असलेल्या २६४ कोटींच्या नुकसानभरपाई विरोधात गोदरेज अँड बॉईस मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने याचिका दाखल केली होती. ही भरपाई कमी असल्याचे गोदरेजचे म्हणणे होते.

केंद्राने कराराचे पालन केले नाही आणि भूसंपादन प्रक्रियेत भरपाईच्या बाबतीत पूर्णपणे चुकीचे धोरण राबवले, असा दावा गोदरेजने केला, तर या याचिकेमुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला होणाऱ्या उशिराचे खापर गोदरेज कंपनीवर फोडत प्रकल्प मार्गी लावण्याची विनंती नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) न्यायालयाला केली. सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने राखून ठेवलेला निर्णय जाहीर करत गोदरेज कंपनीचा दावा अमान्य करत याचिका फेटाळून लावली.

गुजरात आणि महाराष्ट्र अशा दोन्ही राज्यांना जोडणाऱ्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या तब्ब्ल ५०८ किमीच्या मार्गावरील अभियांत्रिकी कामाने आता जोर धरला आहे, अशी माहिती नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक यू. पी. सिंग यांनी दिली. बुलेट ट्रेनचा मार्ग गुजरात, नगर हवेली आणि महाराष्ट्र अशा दोन राज्यांतून आणि एका केंद्रशासित प्रदेशातून जातो. या मार्गाचे काम तीन टप्प्यांत करण्यात येत आहे. या मार्गावर एकूण १२ स्थानके असून गुजरातमध्ये ८, तर महाराष्ट्रामध्ये ४ स्थानके असतील. हा मार्ग गुजरातमधून ३४८ किमी, दादरा नगर हवेलीमधून ४ किमी, तर महाराष्ट्रातून १५६ किमी जाणार आहे. आतापर्यंत गुजरातमधील ३० किमीच्या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.

नर्मदा, तापी, माही आणि साबरमती या महत्वाच्या नद्यांवरून हा मार्ग जाणार आहे. या मार्गावरील पहिल्या पुलाचे काम जानेवारी २०२३ मध्ये पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्यतः ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून हा मार्ग जात असून, मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स ते शीळफाटा हा २१ किमीचा भुयारी मार्ग असेल. या मार्गावर ७ किमीचा मार्ग हा तब्बल ठाणे खाडीखालून जाणार आहे. यासाठी खास ऑस्ट्रेलियन टनेल पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील १२३ किमीच्या मार्गावर तब्बल ३६ ब्रीज आणि ६ टनेल म्हणजेच भूयारे असतील. समुद्राखालून ७ किलोमीटर भूयारी मार्ग निर्माण करण्यासाठी मागविलेल्या टेंडर गुरुवारी ९ फेब्रुवारी रोजी उघडण्यात आली आहेत. ऍफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि लार्सन ऍण्ड टूब्रो लिमिटेड अशा दोनच कंपन्यांची टेंडर या कामासाठी दाखल झाली आहेत.