BMC  Tendernama
टेंडर न्यूज

Mumbai : मुंबईतील 'त्या' 2 मोठ्या रुग्णालयांच्या 3 हजार कोटींच्या पुनर्विकास प्रकल्पाला Green Signal

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेने शीव येथील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयाच्या  (Sion Hospital) विस्तारीत इमारतींचे दुसऱ्या टप्प्यातील पुनर्विकास प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. १३ व १४ मजल्यांच्या एकूण चार इमारतींचे बांधकाम आणि दोन रुग्णालय इमारतींना जोडणारे पादचारी पूल आदी काम करण्यात येत असून सुमारे २४६२ कोटी रुपयांच्या प्रकल्प कामाला आचारसंहितेपूर्वी मंजुरी मिळाली आहे. 'एनसीसी लिमिटेड' या कंपनीला हे टेंडर मिळाले आहे.

याशिवाय राजावाडी रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली आहे. पूर्व उपनगरांतील राजावाडी रुग्णालयावरील वाढलेला रुग्णांचा ताण लक्षात घेता या रुग्णालयाच्या जागेचा पुनर्विकास करून नवीन रुग्णालय इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तळ घर, तळ मजल्यासह १० मजल्यांची इमारत बांधली जाणार असून यासाठी सुमारे ६६५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तब्बल १०२० खाटांचे हे रुग्णालय बांधले जाणार आहे. हे टेंडर 'शायोना कॉर्पोरेशन' कंपनीला देण्यात आले आहे.

अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी यापूर्वी महापालिकेत आरोग्य विभागाचा पदभार स्वीकारून त्यामध्ये सुधारणा करून औषध पुरवठादारांना सुतासारखे सरळ केले होते. त्यामुळे डॉ. जोशी पुन्हा महापालिकेत परतल्यानंतर त्यांच्याकडे आरोग्य विभाग जाईल, असे वाटले होते, परंतु तसे झाले नाही आणि डॉ. सुधाकर शिंदे हे परत आपल्या खात्यात गेल्यांनतरही या पदाचा भार डॉ. जोशी यांच्याकडे आला नाही. मात्र, डॉ. जोशी यांच्याकडे आरोग्य विभागाचा पदभार न सोपवण्यामागील कारण आता स्पष्ट होऊ लागले आहे. सध्या आरोग्य विभागाचा भार डॉ. बिपीन शर्मा यांच्याकडे आहे.

यापूर्वी शीव रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीच्या कंत्राटातील गैरकारभार लक्षात येताच जोशी यांनी त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. त्यावेळी तत्कालिन आयुक्त प्रविणसिंह परदेशी आणि डॉ. जोशी यांच्यात ठिणगी उडाली होते. त्यामुळे परदेशी यांनी पुढे जोशी यांच्या स्वाक्षरीशिवाय स्थायी समितीपुढे प्रस्ताव आणून मंजूर करून घेतला. पण पुढे हाच प्रस्ताव प्रशासनाला काही कारणास्तव मागे घेण्याची नामुष्की आली होती आणि त्यानंतर पुन्हा तो प्रस्ताव आणून मंजूर केला होता.

हा पूर्वेइतिहास शीव रुग्णालयाच्या पहिल्या टप्प्यातील कामाचा असल्याने दुसऱ्या टप्प्यातील कामांमध्ये डॉ. जोशी यांचा अडथळा नको याच भावनेने त्यांना आरोग्य विभागापासून दूर ठेवल्याचे बोलले जाते.

आचारसंहितेपूर्वी २२३५ खाटांची १४ मजली मुख्य इमारत, ५७२ खाटांची १३ मजली इमारत, २१३ खाटांचे १४ मजली इमारत, १३ मजली ओपीडी इमारत तसेच शीव रुग्णालय इमारत ते बराक भूखंड जोडणारे पादचारी पूल अशा स्वरुपाचे काम असणाऱ्या पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला प्रशासकांनी मंजुरी दिली आहे. विविध करांसह २४६२ कोटींचा खर्च या पुनर्विकास करता येणार असून या कामांसाठी 'एनसीसी लिमिटेड' या कंपनीची निवड करण्यात आली आहे.