मुंबई (Mumbai) : मुंबई-दिल्ली महामार्गातील दुसरा टप्पा मुंबई ते बडोदा महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या महामार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर दुहेरी बोगदे उभारण्यात येत आहेत. यातील पहिला बोगदा अंबरनाथमधील भोज ते पनवेलमधील मोर्बेदरम्यान आहे. त्यासाठी अत्याधुनिक अशा एसटीएम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. २०२५ पर्यंत हा महामार्ग खुला होणार असून त्यानंतर पनवेल-कल्याण-अंबरनाथ ही शहरे खूपच जवळ येणार आहेत.
मुंबई-दिल्ली महामार्गातील दुसरा टप्पा मुंबई ते बडोदादरम्यान महामार्ग उभारला जात असून त्याचे काम वेगाने सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई ते दिल्ली हा १,३८६ किलोमीटर लांबीचा द्रुतगती मार्ग उभारला जात आहे. यातील पहिला टप्पा खुला करण्यात आला आहे. याच महामार्गाचा मुंबई ते बडोदा हा दुसरा टप्पा असून या टप्प्याचे काम महाराष्ट्रात सध्या वेगात सुरू आहे. मुंबई-बडोदा महामार्ग पनवेल तालुक्यातील मोर्बे गावात समाप्त होणार असून तेथून पुढे तो इतर मार्गांना जोडला जाणार आहे.
मुंबई ते बडोदा दरम्यानचा हा महामार्ग ४४० किलोमीटर लांबीचा आहे. या महामार्गाचे काम दोन टप्प्यात सुरू असून यातील पहिला टप्पा म्हणजे बडोदा ते तलासरी आणि दुसरा टप्पा म्हणजे तलासरी ते पनवेल तालुक्यातील मोर्बे असा आहे. हा महामार्ग पनवेल येथे समाप्त होणार असल्याने साहजिकच हा परिसर थेट गुजरात आणि दिल्लीशी जोडला जाणार आहे. अंबरनाथ भोज ते मोर्बे येथे दुहेरी बोगद्याचे काम सुरू आहे. मुंबई ते बडोदा एक्सप्रेस वेचे वैशिष्ट्य म्हणजे या महामार्गावर दुहेरी बोगदे उभारण्यात येत आहेत. यातील पहिला बोगदा अंबरनाथमधील भोज ते पनवेलमधील मोर्बेदरम्यान आहे. त्याची लांबी ४.१६ किलोमीटर, रुंदी २१.४५ मीटर असून उंची ५.५ मीटर आहे. माथेरान डोंगरांच्या खालून हा दुहेरी बोगदा उभारला जात असून फेब्रुवारीमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून कामाला सुरुवात झाली आहे. यातील ४.१६ किलोमीटर भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.
दुहेरी बोगद्यासाठी अत्याधुनिक अशा एसटीएम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बोगद्याच्या दोन्ही बाजूने भुयारीकरणाला सुरुवात झाली आहे. बोगद्याचे काम सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२४ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे. मुंबई-बडोदा महामार्ग पनवेलमधील मोर्बे या ठिकाणी संपणार आहे. याठिकाणी टोलनाका आहे. पुढे विरार-अलिबाग महामार्गाला द्रुतगती मार्ग जोडला जाणार आहे. २०२५ मध्ये हा महामार्ग खुला होणार असून पनवेल-कल्याण-अंबरनाथ अंतर कमी होईल.