Mumbai Tendernama
टेंडर न्यूज

रिजेक्टेड 'ऑलेक्ट्रा ग्रीनटेक'ला 1400 ई-बसचे टेंडर कशासाठी?

बेस्टच्या माजी अध्यक्षांच्या प्रश्नाने खळबळ

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ज्या कंपनीच्या ई-बसेस आग लागून पेटल्याच्या घटना समोर आल्या आहेत अशा बेस्ट समितीने रिजेक्ट केलेल्या ऑलेक्ट्रा ग्रीनटेक या पुरवठादारास प्रशासनाने १४०० ई-बसेसचे टेंडर दिल्याचा खळबळजनक आरोप बेस्टचे माजी अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी केला आहे. विशेष म्हणजे, अनेक बड्या कंपन्यांना बाजूला सारत ऑलेक्ट्रा ग्रीनटेकला ही ऑर्डर दिल्यामुळे बेस्ट प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बेस्ट प्रशासनाने मात्र या टेंडरबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले. तर ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने १,४०० इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर मिळाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

बेस्टने मुंबई शहरात मिशन १० हजार इलेक्ट्रिक बसचे उद्धिष्ट निश्चित केले आहे. याअंतर्गत बेस्ट उपक्रमासाठी १२०० इलेक्ट्रिक बस पुरवण्याचे कंत्राट हे ऑलेक्ट्राला देण्यासाठीचा विषय बेस्ट समितीसमोर याआधी मार्च २०२२ मध्ये आला होता. पण पुण्यात ऑलेक्ट्राच्या गाड्या जळाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. तसेच बसेसची कामगिरी आणि बस पुरवण्यातील वेळापत्रक अंमलात झालेली दिरंगाई पाहता बेस्ट समितीने या कंपनीला कंत्राट देण्याचे टाळले होते. पण अडीच महिन्यापूर्वीच बेस्ट प्रशासनाने याच कंपनीला १४०० बसेस देण्यासाठीची नवीन टेंडर प्रक्रिया राबवत आदेश दिले असल्याचे कळते. बेस्ट प्रशासनाच्या याच भूमिकेवर चेंबूरकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या बसेसला आग लागून या जळाल्याच्या घटना पुण्यात समोर आल्या होत्या. तसेच बसेस वेळेत पुरवण्यातही अनियमितता आढळली होती. त्यामुळेच समितीवर असताना आम्ही या बसेस पुरवणाऱ्या ऑलेक्ट्रा कंपनीला कंत्राट न देण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रशासनाने मात्र हा निर्णय घेण्यामागचे कारण काय हे अद्यापही समजू शकले नसल्याचे माजी बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी स्पष्ट केले. समितीच्या एखाद्या निर्णयाला नाकारत अशा प्रकारचा निर्णय घेण्यासाठी प्रशासनाने भूमिका का घेतली असाही सवाल त्यांनी केला.

बेस्ट प्रशासनाच्या २१०० बसेसच्या कंत्राटाच्या टेंडर प्रक्रियेसाठी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक, स्वीच मोबिलीटी, पीएमआय, चार्टर्ड स्पीड, जेबीएम, टाटा मोटर, कॉसीस ई मोबिलीटी, कॉन्टीनेंटल या कंपन्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी तीन जणांना टेंडर प्रक्रियेसाठी ग्राह्य मानण्यात आले. त्याचवेळी स्वीच मोबिलीटी आणि टाटा मोटरसारख्या मोठ्या कंपन्यांना डच्चू दिल्याचेही चेंबूरकर म्हणाले. या प्रक्रियेतील कर्मशिअल टेंडर खुले झाले असते तर किमान दर कोणाचा होता हे स्पष्ट झाले असते. पण बेस्ट प्रशासनाने त्याआधीच निर्णय घेत ऑलेक्ट्रा ग्रीनटेकला टटेंडर देण्याचा निर्णय घेतला. याआधी टाटा पॉवरने ३०० इलेक्ट्रिक बसेस पुरवल्या तेव्हा त्यांचा दर कमी होता हा मुद्दाही त्यांनी यावेळी मांडला. तर बेस्ट प्रशासनाने या टेंडर प्रक्रियेवर अजूनही काम सुरू असल्याचे सांगितले. तसेच कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचेही स्पष्ट केले. दुसरीकडे ऑलेक्ट्रा ग्रीनटेकने एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून १४०० इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर मिळाल्याचा दावा केला आहे.