BMC Tendernama
टेंडर न्यूज

Mumbai : अडीच किलोमीटरच्या 'त्या' उड्डाणपुलावर 12 कोटींची विद्युत रोषणाई; बीएमसीचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईच्या सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत जे जे उड्डाणपुलावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. अडीच किलोमीटर लांब असलेल्या जे जे उड्डाणपुलावर विद्युत रोषणाईसाठी तब्बल १२ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) गुरुवारी या कामाचे टेंडर (Tender) प्रसिद्ध केले आहे. मुंबईच्या सौंदर्यीकरणावर एकूण १७०५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार मुंबईच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यात झाडांवर आकर्षक विद्युत रोषणाई, पुलाखाली रंगरंगोटी, समुद्रकिनारी सौंदर्यीकरण अशी १२०० कामे हाती घेतली असून, ९१४ कामे पूर्ण झाली आहेत. यावर ७१५ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. मात्र सौंदर्यीकरणावर करण्यात आलेल्या खर्चानंतर अनेक झाडांवरील विद्युत रोषणाई बंद आहे. पुलाखालील रंगरंगोटीचा कलर उडाला आहे. तरीही जेजे उड्डाणपुलावर विद्युत रोषणाई करण्यात येणार असून, यासाठी १२ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. या कामाचे गुरुवारी टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर असून त्याचे सौंदर्यीकरण, सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यात रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक बेटे, समुद्रकिनारे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुधारणा, सुशोभित हरितीकरण, आकर्षक प्रकाशयोजना अशी कामे हाती घेतली आहेत.

रस्त्यांचे पुनर्पृष्‍टीकरण, झेब्रा क्रॉसिंग, रस्ते दुभाजकांमधील मोकळ्या जागेत सुशोभित फुलझाडांची हिरवळीची लागवड, १५ किलोमीटर लांबीच्या फुटपाथवर स्टॅम्प काँक्रिट, आकर्षक विद्युत दिवे, अतिरिक्त जागेत शोभिवंत कुंड्या, पदपथांवर जिथे शक्य आहे तिथे नाविन्यपूर्ण, कलापूर्ण व परिसर सौंदर्य वाढविणारी आसने लावणे, पथदिव्यांचे सुशोभीकरण, विद्युत खांबांना प्रकाश योजना, अनधिकृत केबल, लटकलेल्या तारा काढून टाकणे आदी कामे केली जाणार आहेत.

तसेच मुंबई महानगराला इतिहासाचा वारसा असून महानगरात असलेल्या किल्ल्यांवर विद्युत रोषणाई करण्यात यावी, त्यातून पर्यटनाला अधिक चालना मिळेल. तसेच भारताचे प्रवेशद्वार असलेल्या गेटवे ऑफ इंडिया परिसराचे सुशोभीकरण हाती घेण्यात आले आहे.