MSRTC Tendernama
टेंडर न्यूज

MSRTC: राज्याची जीवनवाहिनी पुन्हा 'टॉप गिअर'मध्ये धावणार; कारण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : एसटी प्रशासन (MSRTC) आपल्या प्रवासी सेवेचा पुन्हा ‘टॉप’ गियर टाकण्यासाठी सज्ज होत आहे. लवकरच स्व मालकीच्या तब्बल २७०० बस प्रवासी सेवेत दाखल होणार आहेत. पैकी २०० हिरकणी व ४५० लालपरी बसच्या बांधणीला सुरवात देखील झाली आहे. राज्यातील दापोडी, संभाजीनगर व नागपूर मध्यवर्ती कार्यशाळेत बसची बांधणी होणार असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेत बांधण्यात येणाऱ्या बसची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना चन्ने यांनी माहिती दिली. या वेळी एसटीचे महाव्यवस्थापक नंदकुमार कोलारकर, दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेचे व्यवस्थापक दत्तात्रेय चिकुर्डे, जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले आदी उपस्थित होते.

चन्ने म्हणाले, एसटी गाड्यांची संख्या घटलेली आहे. कोरोनानंतर नव्या बसची खरेदी झालेली नाही. राज्यात एसटीच्या १३ हजार ५०० बस गाड्या धावत आहेत. प्रवासी सेवा चांगली व विस्तार करायची असेल तर बसच्या संख्येत वाढ करणे गरजेचे आहे. त्यासाठी एसटी प्रशासन भाडे तत्त्वावर स्व मालकीच्या गाड्याची संख्यादेखील वाढवत आहे.

७०० चेसीची खरेदी केली असून, त्यावर बॉडी बांधण्याच्या कामालादेखील सुरवात झाली आहे. दोनशे हिरकणी, ४५० लालपरी, ५० स्लिपर बस तयार करण्यास सुरवात झाली आहे. पैकी १४५ लालपरी बस तयार झाल्या आहेत. तसेच एक हिरकणीदेखील तयार होऊन प्रवासी सेवेत येण्यास सज्ज झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

५०० बस भाडेतत्त्वावर घेणार

एसटी प्रशासन या वर्षात ५०० बस भाडेतत्त्वावर घेणार आहे. त्यामुळे एसटीचा ताफा आणखीच वाढणार आहे. यात प्रामुख्याने लातूर ६०, कोल्हापूर ६०, रायगड ५०, रत्नागिरी ५०, सांगली १००, पुणे ८० या ठिकाणी बसभाड्याने घेतल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न राहणार आहे.