मुंबई (Mumbai) : राज्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये महान व्यक्तींच्या चेहऱ्यांची शिल्पे कोरण्याची अभिनव कल्पना (मेमोरिअल म्युझिअम) प्रत्यक्षात उतरवण्याचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा (MSRDC) विचार आहे. त्यासाठीचा प्रकल्प आराखडा साकारण्यासाठी आणि राज्यात कुठे कुठे अशी शिल्पे तयार करता येतील, तशा जागा निवडण्यासाठी सल्लागार नेमणूक करण्यात येणार आहे. महामंडळाने याचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.
या माध्यमातून देशाच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासातील महान व्यक्तींना मानवंदना दिली जाईल. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना महान व्यक्तींच्या कार्याबाबत माहिती देण्यात येईल. तसेच, या माध्यमातून राज्यातील पर्वतरांगा असलेल्या भागांचा टूरिस्ट डेस्टिनेशन म्हणून विकास होईल.
पर्यटक येत असल्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल. या ठिकाणी पर्यटकांसाठी पार्क, म्युझियम, दर्शक गॅलरी, सेल्फी पॉईंट्स अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि वारसा लक्षात घेऊन महामंडळामार्फत योग्य ठिकाणांची निवड केली जाणार आहे.
स्थान निश्चित झाल्यानंतर शिल्पांवर काम सुरू होईल. याचवेळी, शिल्पांसाठी ठरलेल्या जागेच्या आजूबाजूचा देखील विकास करण्यात येईल, जेणेकरून पर्यटकांसाठी आवश्यक त्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होतील. या ठिकाणी अॅडव्हेंचर, कल्चरल, इको अशा प्रकारचे टूरिझम आणि मनोरंजक उपक्रम उपलब्ध करून दिले जातील. तसेच, स्थानिक कला आणि संस्कृतीला चालना देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल.
प्रकल्पांसाठीचे ऑप्टिमल स्टक्चरही तयार करण्याची जबाबदारी सल्लागारावर सोपवण्यात येणार आहे. सोबतच, इतर पर्यायांसह सार्वजनिक-खासगी भागीदारी, देणगीदारांची गुंतवणूक, निव्वळ खासगी गुंतवणूक अशा विविध मॉडेल्सच्या आर्थिक व्यवहार्यतेचे मूल्यांकन करणार आहे.
अमेरिकेतील माउंट रशमोर या ठिकाणी डोंगरात अमेरिकेच्या माजी राष्ट्रपतींचे चेहरे असलेली शिल्पे साकारण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात हा प्रयोग राबवला जाणार आहे.