Vande Metro Tendernama
टेंडर न्यूज

MRVC : 238 वंदे मेट्रोसाठी ग्लोबल टेंडर; 20 हजार कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) बुधवारी (ता.२१) २३८ वंदे मेट्रोसाठी ग्लोबल टेंडर प्रसिद्ध केले आहे. सुमारे २० हजार कोटी रुपयांचे हे बजेट आहे. २९ सप्टेंबर २०२३ पर्यंत या टेंडरसाठी मुदत देण्यात आली आहे.

मेड इन इंडियाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या वंदे भारत ट्रेनपाठोपाठ केंद्रीय रेल्वे बोर्डाने वंदे भारतच्या धर्तीवर वंदे मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या वंदे मेट्रोला मुंबईत उपनगरी लोकल सेवा म्हणून चालविण्यात येणार आहेत. रेल्वे बोर्डाने मंजूर केलेल्या एमयूटीपी ३ आणि एमयूटीपी ३ अ अंतर्गत २३८ वंदे मेट्रो लोकलची खरेदी करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाला मंजुरीही देण्यात आली होती. आता मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) भारतीय बनावटीच्या वंदे मेट्रोकरिता ग्लोबल टेंडर प्रसिद्ध केले आहे. येत्या २९ सप्टेंबरपर्यंत टेंडर भरता येणार आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्पात (एमयूटीपी) मुंबईकरांच्या आरामदायी प्रवासासाठी एकूण २३८ वातानुकूलित लोकल बांधण्याचे प्रस्तावित आहे. यात एमयूटीपी-३ मधील ४७ आणि एमयूटीपी-३ अ मधील १९१ वातानुकूलित लोकलचा समावेश आहे. आता या सर्व लोकल वंदे मेट्रो असणार आहेत. यासाठी २० हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. या लोकलसाठी रेल्वे बोर्डाने गेल्या महिन्यात मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता एमआरव्हीसीने टेंडर प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे.