नवी दिल्ली (New Delhi) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भारतीय लष्करात ठेकेदारीने सैन्यभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारची ही पद्धत अयोग्य असून, ठेकेदारीने सैन्यभरती झाल्यास तो लष्कराचा अपमान असेल, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केले आहे. (Agneepath Controversy)
केंद्र सरकारने नुकतेच भारतीय लष्करात भरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार ४ वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती केली जाणार आहे. केंद्र सरकारने या योजनेची घोषणा केल्यानंतर देशभर याचे पडसाद उमटत आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात येत असून, रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. या योजनेवरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
राऊत म्हणाले, की केंद्र सरकारची प्रत्येक योजना अपयशी ठरली आहे. सैन्यामध्ये जर ठेकेदारी पद्धतीने भरती होणार असेल तर भारतीय सैन्याची प्रतिष्ठा रसातळाला जाईल. सैन्यावर संपूर्ण देशाची जबाबदारी आहे, त्यांना कंत्राटी पद्धतीने कसं काय घेतलं जाऊ शकते. ठेकेदारी पद्धतीने भरती हा संपूर्ण भारतीय सैन्य दलाचा अपमान आहे. फक्त नोकरी म्हणून कामावर ठेवणे हा संपूर्ण भारतीय सैन्य दलाचा अपमान आहे. राष्ट्रीय सुरक्षा दलाचा अपमान आहे. ठेकेदारीवर काम करणारे दुसरे असतात. देशाचं रक्षण करणाऱ्या सैन्याला ठेकेदारीवर ठेवले जाऊ शकत नाही.
देशात सध्या काय चाललं आहे किंवा काय होणार आहे हे कोणालाच माहित नाही. या योजनेवरुन संपूर्ण देशात वणवा पेटला आहे. मोदी सरकारने 10 लाख, 20 लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. याआधी 2 कोटी, 10 कोटी अशा घोषणा केल्या होत्या. आता नवीन अग्निपथ. सैन्याला एक शिस्त असते. सैन्यामध्ये ठेकेदारीने सैन्यभरती झाल्यास तो लष्कराचा अपमान असेल, असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे.