मुंबई (Mumbai) : प्रवाशांच्या दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनांना राज्यात टोल नाही. केवळ व्यवसायिक वाहनांकडून टोल वसूल केला जात आहे, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज पत्रकार परिषदेत या वाहनांकडून टोल घेतल्यास आम्ही टोलनाके जाळून टाकू, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे.
राज ठाकरे यांनी शिवतीर्थ येथे पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. ते पुढे म्हणाले की, फडणवीस तसे म्हणत असतील तर आम्ही टोलनाक्यांवर आमची माणसे उभी करू व प्रवाशांच्या वाहनांना टोल आकारु देणार नाही. मात्र, आम्हाला कुणी विरोध केला तर तो टोलनाकाच जाळून टाकू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. यावेळी टोलवसुली हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम आहे, असा दावा राज ठाकरे यांनी केला. राज्यातील टोलवसुलीवर अनेक राजकारण्यांचे उदरनिर्वाह होत आहेत. त्यामुळे प्रत्येक टोलनाक्यावरुन किती टोलवसुली होत आहे? कधीपर्यंत टोलवसुली केली जाणार आहे? याचा हिशेब झालाच पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.
तसेच त्याच-त्याच लोकांना कंत्राट मिळते कसे? असा प्रश्न राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधारी आणि विरोधातील नेत्यांचे टोल संबंधित जुने सात व्हिडिओ दाखवले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्धव ठाकरे यांच्या जुन्या क्लीप त्यांनी दाखवल्या. व्हिडीओ क्लिप दाखवल्यानंतर राज ठाकरे म्हणाले की, ही माणसे प्रत्येकवेळी टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा करतात, या सगळ्यांची सरकारे महाराष्ट्रात येऊ गेली पण एकही गोष्ट झाली नाही. टोल हे राजकारणातील अनेक लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे, असा आरोपही राज ठाकरे यांनी केला.