Mumbai Metro Tendernama
टेंडर न्यूज

MMRDA : मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला मेट्रोने जोडणार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : नवी मुंबई विमानतळ सुरु झाल्यानंतर प्रवासी वाहतूक सुलभ रीतीने व्हावी यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) (MMRDA) मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला मेट्राने जोडण्याची चाचपणी सुरु केली आहे. 35 किलोमीटर लांबीच्या या भुयारी मेट्रो मार्ग प्रकल्पासाठी सुमारे 15 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

सिडको आणि एमएमआरडीए या दोन्ही संस्था संयुक्तपणे या मार्गाचे काम पाहणार आहेत. नवी मुंबई परिसरात शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) हे काम पाहणार आहे तर, मुंबई महानगर प्रदेशात एमएमआरडीए या कामाची पाहणी करणार आहे. मेट्रो 8 कॉरिडॉरमुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आगामी नवी मुंबई विमानतळ जोडले जाणार आहेत. 2014 पासून एमएमआरडीए या मेट्रो मार्गासाठी प्रयत्नशील आहे. जवळपास 35 किलोमीटर लांबीचा हा मेट्रो मार्ग भुयारी असेल. या प्रकल्पासाठी अंदाजे 15 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर सात स्थानके असणार आहेत. तसेच, दररोज नऊ लाख प्रवाशांना याचा फायदा होईल असा अंदाज आहे.

प्रस्तावित मार्गानुसार ही मार्गिका अंशत: भूमिगत असणार आहे. घाटकोपर येथील अंधेरी आणि ईस्टर्न एक्सप्रेसवे दरम्यान हा मार्ग भूमिगत असणार आहे. तर घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडमार्गे मानखुर्दपर्यंत उन्नत मार्ग असणार आहे.

दरम्यान, नवी मुंबईत बेलापूर ते पेंधर तळोजा असा 11 किलो मीटरचा मेट्रो रेल्वे मार्ग महिन्याभरात सुरु होण्याचा अंदाज आहे. गेल्या  12 वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता. अखेर या मार्गावरील सर्व स्थानकांचे काम पूर्णत्वास आल्याने येत्या १ मे ला महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर ही मेट्रो रेल्वे सुरू करण्याचा सिडकोचा मानस आहे. यासाठी सध्या युध्द पातळीवर कामे सुरु आहेत. मेट्रो सुरू करण्यासाठी लागणारी रेल्वे सुरक्षा आयुक्तांची परवानगी सुध्दा घेण्यात आली आहे. बेलापूर ते पेंधर मार्गावरील ट्रॅकवर मेट्रो गाडीच्या चाचण्या सुद्धा सुरु आहेत.