MMRDA Tendernama
टेंडर न्यूज

मॉन्सूनसाठी MMRDAची जय्यत तयारी; प्रकल्पांच्या ठिकाणी आपत्कालीन नियंत्रण कक्ष

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या तसेच पूर्ण झालेल्या विविध प्रकल्पांच्या ठिकाणी वाहनांची आणि पादचाऱ्यांची गैरसोय कमी करण्यासाठी एमएमआरडीएने आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. झाडे उन्मळून पडणे, पाणी साचणे, अपघात, वाहतूक कोंडी, खड्डे अशा विविध बाबींवर नागरिकांना नियंत्रण कक्षाची मदत घेता येणार आहे. नियंत्रण कक्षाचे कर्मचारी तीन शिफ्टमध्ये २४ तास कार्यरत असणार आहेत.

एमएमआरडीएने स्थापन केलेला नियंत्रण कक्ष ०१ जून ते १५ ऑक्टोबर या कालावधीत कार्यरत असणार आहे. या कक्षाच्या माध्यमातून नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचे निरसन आणि निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था इत्यादी विविध आपत्ती नियंत्रण संस्थांशी समन्वय साधण्यात येणार आहे. मॉन्सून दरम्यान उद्भवणाऱ्या आपत्कालिन परिस्थितीसाठी प्रत्येक मेट्रो प्रकल्प स्थळी १ अभियंता आणि १० मजुरांची टीम (आपत्कालीन दल )तैनात असेल. विविध मेट्रो प्रकल्पस्थळी अशा एकूण १९ आपत्कालीन प्रतिसाद दलाच्या माध्यमातून सुमारे ३०० पेक्षा अधिक अभियंते आणि कामगार तैनात करण्यात आले आहेत. त्यासोबतच एकूण १८ आपत्कालिन केंद्र, १८ देखभाल वाहने आणि १७ ॲम्ब्युलन्सची तरतूद करण्यात आली असून ही सुविधा २४ तास उपलब्ध असणार आहे. प्रकल्पलगतच्या भागात पाण्याचा निचरा योग्य रितीने करण्यासाठी आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या क्षमतेचे सुमारे १३१ पाणी उपसा करणारे पंप उपलब्ध करण्यात आले आहेत.

मेट्रो प्रकल्प स्थळालगत वाहनांच्या आणि पादचाऱ्यांच्या रहदारीसाठी जास्तीत जास्त रुंदीचा रस्ता उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी शक्य असेल त्या भागातील बॅरिकेड्स आत खेचण्यात आले आहेत. कामे पूर्ण झालेल्या भागातील बॅरिकेड्स काढण्यात आले आहेत. तसेच भविष्यात देखील काम पूर्ण झालेल्या भागातील बॅरिकेड्स काढण्यात येणार आहेत. या सोबतच प्रकल्पस्थळावरून मातीचा ढीग काढणे, खराब झालेले नाले आणि दुभाजक दुरूस्त करणे, पाईलिंग आणि पाईल कॅपची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजित असून आवश्वकतेनुसार महापालिकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही कामे सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यासोबतच विद्युत उपकरणांमुळे उद्भवणारे धोके टाळण्यासाठी विद्युत उपकरणांची आवश्यक चाचणी पूर्ण करण्यात आली आहे.

'प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या तसेच पूर्ण झालेल्या प्रकल्पांच्या ठिकाणी योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना प्रकल्प प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत इतर संस्थांना गरज भासल्यास तातडीची मदत पुरविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मान्सूनमध्ये येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी एमएमआरडीएने पूर्ण तयारी केली आहे.'
- संजय मुखर्जी, महानगर आयुक्त एमएमआरडीए

आपत्कालीन संपर्क क्रमांक
दूरध्वनी क्रमांक -०२२- २६५९१२४१, ०२२-२६५९४१६३,
भ्रमणध्वनी क्रमांक -८६५७४०२०९० आणि
टोल फ्री क्रमांक - १८००२२८८०१