Eknath Shinde Tendernama
टेंडर न्यूज

MMRDAचा विधानसभेआधी मोठा धमाका; शिंदेंच्या ठाण्यातील प्रकल्पांसाठी साडेसात हजार कोटींचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde0 यांच्या ठाणे जिल्ह्यातील प्रवास आगामी काळात वेगवान होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएने विविध प्रकल्पांसाठी सुमारे साडेसात हजार कोटींची टेंडर प्रसिद्ध केली आहेत. यात ठाण्यातला बाळकुम ते गायमुख किनारा मार्ग, छेडानगर ते ठाणे उन्नत मार्ग विस्तारीकरण, कासारवडवली ते खारबाव आणि गायमुख ते पायेगाव खाडी पूल, जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार ते काटई नाका उन्नत मार्ग तसेच विठ्ठलवाडी ते कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या उन्नत मार्ग प्रकल्पाचा समावेश आहे.

एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात अनेक प्रकल्प सुरू आहेत. त्यात पूर्वमुक्त मार्गावरील घाटकोपर येथील छेडानगर ते ठाण्याच्या कोपरीपर्यंत उन्नत मार्ग उभारण्याचा प्रस्ताव आहे. या मार्गात सात जंक्शन आणि ६ उड्डाणपूल येतात. हा मार्ग एकूण १३ किलोमीटरचा असून सहा पदरी उन्नत मार्ग यामुळे उपलब्ध होणार आहे. यासाठी सुमारे २ हजार कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गाच्या उभारणीसाठी एमएमआरडीएने नुकतेच टेंडर प्रसिद्ध केले आहे. संकल्पन आणि बांधकामासाठी हे टेंडर आहे. या प्रकल्पासह अन्य सहा प्रकल्पांसाठी टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात बाळकुम ते गायमुख राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ घोडबंदरर रस्ता अर्थात ठाणे किनारी मार्गाचाही समावेश आहे. या कामासाठी अंदाजे २,१७० कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांची टेंडर एमएमआरडीएने प्रसिद्ध केली आहेत. यात कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील पाल्मस वॉटर रिसॉर्ट ते बदलापूर रस्ता ते विठ्ठलवाडी येथील जुन्या पुणे लिंक रस्त्यापर्यंतच्या उन्नत मार्गाचा समावेश आहे. एकूण ६४२ कोटींच्या या मार्गाच्या उभारणीमुळे वालधुनी आणि कल्याण कर्जत तसेच कल्याण कसारा रेल्वे मार्गामुळे थेट मार्ग नसलेला भाग जोडला जाणार आहे. यासोबतच जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ते काटई नाकापर्यंतच्या उन्नत मार्गाचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले असून ६.३ किलोमीटरचा हा मार्ग आहे. यासाठी अंदाजे ९०७ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर सध्या वाहनचालकांना कोंडीचा सामना करावा लागतो. ठाण्याच्या कासारवडवलीपासून भिवंडीच्या खारबावपर्यंत आणि गायमुख ते पायेगावपर्यंतच्या दोन खाडीपुलाच्या कामांसाठी टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकल्पांचा खर्च अंदाजे १ हजार ६०० कोटी आहे.