Nitin Gadkari Tendernama
टेंडर न्यूज

नितिन गडकरी म्हणाले, रस्त्यावर खड्डे पडले तर ठेकेदारांना बुलडोजरच्या खाली टाकू

टेंडरनामा ब्युरो

वाशिम (Washim) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महाराष्ट्रात वाशिम येथे 3,695 कोटी रुपयांच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी गडकरी यांनी विकासकार्यात राजकरण आणू नये असे स्पष्ट शब्दात उपस्थित नेते मंडळी तसेच आमदार, खासदार यांना सांगितले. तसेच म्हणाले की, 'विकासकार्यासाठी मी एवढे पैसे आणून देतो; आमदार, खासदार व नेत्यांनी ठेकेदारांना त्रास देऊ नये. ठेकेदारांना मदत करुण सहकार्याची भावना ठेवली पाहिजे व विकास केला पाहिजे. नेत्यांच्या त्रासामुळे ठेकेदार म्हणतात त्यांना काम करायचे नाही, ठेकेदार काम सोडून पळून जातात. तुम्ही मदत करा जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा रस्ते विकासासाठी मी द्यायला तयार आहे. 

रस्त्यावर खड्डे पडले की ठेकेदारांना बुलडोजरच्या खाली टाकू : 

या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठेकेदारांना ही खड़े बोल सुनावले. रस्त्याच्या विकासकामात मी तडजोड करणार नाही, रस्त्यावर जर एखादा ही खड्डा पडला, क्रैक झाला, खराब झाला तर ठेकेदारांना बुलडोजरच्या खाली टाकू असे स्पष्ट शब्दात त्यांनी ठेकेदारांना खड़सावले. सोबतच म्हणाले की त्यांनी आतापर्यंत 50 लाख कोटी रूपयाची कामे दिली आहे पण एकही ठेकेदाराला त्यांच्या घरी यायची गरज पडली नाही. 

गेल्या नऊ वर्षात वाशिम जिल्ह्यात विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा 227 किलोमीटर महामार्ग बांधण्यात आला. महाराष्ट्रातील अकोल्यामधून तेलंगणातील संगारेड्डी येथे जाणारा चौपदरी राष्ट्रीय महामार्ग 161 हा दोन्ही राज्यांमधील व्यापार अधिक मजबूत करणारा दुवा ठरला आहे. एकूण तीन पॅकेजमध्ये विभागलेले, अकोला ते मेडशी या महामार्गावरील 48 किमी आणि 1,259 कोटी रुपये खर्चाच्या  पहिल्या पॅकेजमध्ये  चार एअर पूल, 10 अंडरपास आणि 85 कल्व्हर्ट आहेत. मेडशी ते वाशीम या 45  किमी अंतराच्या 1,394 कोटी रुपये खर्चाच्या पॅकेजमध्ये 13 बस आश्रयस्थान, सहापदरी   रोड ओव्हर ब्रिज आणि वाशिम शहर बायपासचा समावेश आहे. याशिवाय पांगरी  ते वारंगाफाटा या 42 किमी आणि  1042 कोटी रुपये खर्चाच्या पॅकेजमध्ये कयाधू नदीवरील मुख्य पूल, कळमनुरी आणि आखाडा-बाळापूर सिटी बायपासचा समावेश आहे.

अकोला, वाशिम, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील अनेक महत्वाची ठिकाणे आता जोडली जातील. शेगावचे गजानन महाराज मंदिर, अकोला शाहनूर किल्ला, अंतरीक्ष जैन मंदिर, आठवे ज्योतिर्लिंग औंढा-नागनाथ, संत नामदेव महाराज संस्थान, नरसी आणि नांदेडमधील तख्त सचखंड गुरुद्वारा यांसारख्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट देणे आता सोपे आणि सुलभ होणार आहे. तसेच महामार्गांमुळे  महाराष्ट्र आणि तेलंगणामधील व्यवसाय संधी सुलभ होऊन  रोजगार निर्मिती देखील वाढीला लागेल. अमृत सरोवर योजनेंतर्गत सावरगाव बर्डे, झोडगा खुर्द, चिवरा, आमणी, सायखेडा किंवा इतर गावातील तलावांचे पुनरुज्जीवन  करण्यात आले त्यातून निघालेली माती आणि वाळू या राष्ट्रीय महामार्ग 161 च्या बांधकामात वापरण्यात आली आहे.