मुंबई (Mumbai) : कोट्यवधी रुपये खर्चून काँक्रीटीकरण होत असलेल्या माणगाव-दिघी रस्त्यावर वर्षभरापासून भेगा पडत आहेत. आता तर त्या आणखी रुंद होत आहेत. अल्पावधीतच रस्त्याला भेगा पडल्याने हे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या रस्त्याचे लोकार्पण केले आहे. माणगाव-म्हसळा-दिघी बंदर हा राष्ट्रीय मार्ग ७५३ एफवर ५४.७५० किमीचा दुहेरी सिमेंट काँक्रीटचा रस्ता करण्यात आला आहे. यासाठी ४५७.५२ कोटी रुपये खर्च आला आहे.
दिघी-पुणे महामार्गाचा पहिला टप्पा म्हणून माणगाव ते दिघी रस्त्याचे काम आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. दिघीपर्यंत काही ठिकाणी काँक्रीटीकरण झाले आहे. मात्र, ज्या ठिकाणी काँक्रीटीकरण झाले, तेथेच भेगा पडलेल्या आहेत. विशेषतः माणगाव ते म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यातील वेळास येथील रस्ता घाईघाईने केल्याचे निदर्शनास येत आहे. हा रस्ता बांधायला कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, काही महिन्यांतच रस्त्यावर भेगा पडायला सुरुवात झाली आहे. भेगा पडल्याने येत्या काही महिन्यांतच रस्त्याचा दर्जा आणखी खालावण्याची भीती आहे. या कामांसह अभियंत्यांवर वचक न राहिल्याने सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची दुरवस्था होत असल्याची टीका होत आहे. हे काम जे. एम. म्हात्रे या कंत्राटदाराकडून होत आहे. यासाठी ३०० कोटींहून अधिक खर्च झाले आहेत.
दोन वर्षांपूर्वीच रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. काही ठिकाणे वगळता इतरत्र काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला, तरी हे काम करताना दर्जा राखला गेला नाही. परिणामी, रस्त्याला अनेक भागांत तडे गेले आहेत. वेळास, मेंदडी तसेच खरसई येथे रस्त्यात मधोमध मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत. यातून रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. या कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून तपासणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
माणगाव-दिघी महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्याचे काम अजूनही सुरूच आहे. रस्त्याला तडे जाण्याची वेगवेगळे कारणे असतात. काम पूर्ण करण्यापूर्वी आम्ही रस्त्याची दुरुस्ती करू.
- सचिन निफाडे, अभियंता, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ
वडवली-वेळास दरम्यानचा रस्ता अतिशय घाईघाईने केल्याचे दिसते. त्यामुळे रस्त्यावर भेगा पडल्या आहेत. रस्त्याच्या पाहणीवरून काँक्रीटीकरणाच्या कामात हलगर्जीपणा केल्याचे दिसते. कोट्यवधीच्या कामात चांगले रस्ते का बनू शकत नाही. यासाठी रस्त्याच्या दर्जाची तपासणी करावी.
- दीपक कांबळे ग्रामस्थ
कोट्यवधींचा खर्च -
माणगाव-म्हसळा-दिघी बंदर हा राष्ट्रीय मार्ग ७५३ एफवर ५४.७५० किमीचा दुहेरी सिमेंट काँक्रीटचा रस्ता करण्यात आला आहे. यासाठी ४५७.५२ कोटी रुपये खर्च आला आहे, असे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना सांगितले होते.
माणगाव-दिघी बंदर - ५४.७५० किमी
खर्च - ४५७.५२ कोटी रुपये