Mercedes Benz Uday Samant News मुंबई : यंदा मर्सिडीज बेंझ (Mercedes Benz) महाराष्ट्रात 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराची (Employment) संधी उपलब्ध होणार असल्याचे उदय सामंत यांनी समाज माध्यमातून सांगितले आहे.
राज्यात गुंतवणूक वाढीसोबत रोजगार निर्मितीसाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. राज्याचे उद्योगमंत्री यांनी 'एक्स'वर म्हटलं की, "जर्मनी दौऱ्यावर असताना मर्सिडिझ बेंझ कंपनीच्या प्रतिनिधीसोबत बैठक झाली. मर्सिडिझ बेंझ ही कंपनी यावर्षी महाराष्ट्रामध्ये 3000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्यांसह रोजगारात मोठ्या संख्येने वाढ होणार आहे. यासंदर्भात चर्चा झाली."
यावेळी मर्सिडीज कंपनीचे मर्सिडीज-बेंझ ग्रुप ऑफ मॅनेजमेंट बोर्डाचे सदस्य डॉ. जोर्ग बर्झर, पॉलिटिकल ऑपरेशन्स - एक्सटर्नल अफेयर्स, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी संचालक मरिना क्रेट्स, विक्री आणि विपणन, ओव्हरसीज, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी संचालक मार्टिन शुल्झ, मर्सिडीज-बेंझ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कार्यकारी संचालन प्रमुख व्यंकटेश कुलकर्णी आदी उपस्थितीत होते.
महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यांत पळवून नेल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर सामंत यांनी दिलेल्या माहितीकडे पाहिले जात आहे.