Mazagon Dock Tendernama
टेंडर न्यूज

'माझगाव डॉक'ची ग्लोबल भरारी; आता यूएस, फ्रान्सच्या युद्धनौकाही...

मारुती कंदले

मुंबई (Mumbai) : माझगाव डॉककडे (Mazagon Dock) सध्या एकाचवेळी १० युद्धनौका (Warship) व ११ पाणबुड्या ( Submarine) बांधण्याची किंवा दुरुस्त करण्याची क्षमता आहे. सध्या कंपनीकडे ४६ हजार कोटींचे ऑर्डरबूक असून, काही वर्षांतच एक लाख कोटींची कामे मिळविण्याचे आमचे उद्धिष्ट आहे, अशी माहिती माझगाव डॉकचे अध्यक्ष व्हाईस व्हाईस अॅडमिरल (नि.) नारायण प्रसाद यांनी दिली.

पुढील आठवड्यात जलावतरण होत असलेल्या स्कॉर्पिओ वर्गातील पाणबुडीच्या पाहणीसाठी प्रसारमाध्यमांना आमंत्रित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. अमेरिका, फ्रान्स आदी देशांसाठीही युद्धनौका निर्मिती करण्याची तयारी आम्ही दाखवली आहे. त्यांच्या युद्धनौकांची देखभाल दुरुस्तीही माझगाव डॉकमध्ये होऊ शकते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सध्या आमच्याकडे सहा स्कॉर्पिओ बनावटीच्या पाणबुड्या, चार विनाशिका व १४ स्टेल्थ फ्रिगेट यांच्या बांधणीची ४६ हजार कोटी रुपयांची कामे आहेत व येत्या काही वर्षांत एक लाख कोटी रुपयांपर्यंतची कामे मिळविण्याचे आमचे उद्धिष्ठ आहे. यात 'प्रोजेक्ट ७५ आय'च्या सहा स्वदेशी पाणबुड्या व पाच विनाशिकांचा समावेश असेल, अशी माहिती प्रसाद यांनी दिली.

आतापर्यंत माझगाव डॉकने वेगवेगळ्या प्रकारच्या २४३ बोटी-युद्धनौका इराण, येमेन, सिंगापूर, मेक्सिको या देशांना निर्यात केल्या आहेत. पाच-सहा महिन्यांपूर्वी अमेरिका, फ्रान्स, ब्राझिल यांचे वरिष्ठ नौदल अधिकारी भारतात आले असता त्यांना हव्यातशा अत्याधुनिक युद्धनौका (फ्रिगेट, डिस्ट्रॉयर) व पाणबुड्या वेळेत व त्यांच्याकडील किंमतीच्या ७५ टक्के किंमतीत निर्माण करण्याची हमी आम्ही त्यांना दिली आहे. माझगाव डॉकमध्ये एकाचवेळी २१ युद्धनौका व पाणबुड्या निर्माण करण्याची क्षमता आहे. मात्र ती पूर्णपणे वापरली जात नाही, असेही प्रसाद यांनी स्पष्ट केले.

बीपीटीच्या जागेचा वापर
अमेरिकेच्या २०० मीटर पेक्षा कमी लांबीच्या जहाजांची देखभाल दुरुस्तीही आम्ही करू शकतो. त्यांच्या मोठ्या युद्धनौकांची देखभाल दुरुस्ती कोचीनला होऊ शकते. तर मुंबई पोर्ट ट्रस्टकडेही एक मोठा ड्रायडॉक असून तेथेही अमेरिकेच्या मोठ्या युद्धनौकांची देखभाल दुरुस्ती होऊ शकते. याबाबत आमची बोलणी सुरू असून त्यांनी संमती दिली तर हे काम होऊ शकते, असेही प्रसाद यांनी सांगितले.