मुंबई (Mumbai) : देशाच्या आर्थिक राजधानीला राज्याच्या उपराजधानीशी जोडणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर महाराष्ट्रातील सर्वांत लांब बोगदा तयार झाला आहे. सुमारे ७.७८ किमी लांबीच्या दुहेरी बोगद्याचे नागरी काम पूर्ण झाले आहे. नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर इगतपुरीजवळील वाशाळा येथे एफकॉन कंपनीतर्फे मुंबई-नागपूर ग्रीन फील्ड एक्स्प्रेस-वेवर हा बोगदा बांधण्यात येत आहे. हा बोगदा 'न्यू ऑस्ट्रेलियन टनेलिंग मेथड' नावाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आला असून, त्यामुळे त्याचे आयुष्य १०० वर्षे इतके दीर्घ आहे. (Mumbai Nagpur Greenfield Expressway)
ग्रीनफिल्ड एक्स्प्रेसवेच्या मार्गावर बांधण्यात येणाऱ्या सहा बोगद्यांपैकी हा बोगदा महाराष्ट्रातील सर्वांत लांब आणि रुंद महामार्ग बोगदा आहे. हा ३-लेन दुहेरी बोगदा डावीकडे ७.७८ किमी आणि उजवीकडे ७.७४ किमी आहे आणि ३५ मीटर रुंद आहे. सध्या कसारा घाट ओलांडण्यासाठी वाहनधारकांना २० ते २५ मिनिटे लागतात, तर हा बोगदा अवघ्या ५ ते ६ मिनिटांत घाट ओलांडू शकणार आहे. ट्विन बोगद्याच्या आतील काँक्रिट रस्त्याचे काम आता पूर्ण झाले आहे. बोगद्याच्या कामानंतर जे सर्वांत महत्त्वाचे काम आहे. आता विजेचे दिवे, पंखे बसवणे आदी कामे प्रलंबित आहेत. ती सुद्धा लवकरच पूर्ण होणार आहेत.
समृध्दी महामार्गावरील बोगदे १०० वर्षे टिकू शकतील अशा पद्धतीने बांधण्यात आले आहे. या महामार्गावर १२० किमी प्रतितास पेक्षा जास्त वाहनांची वेग मर्यादा आहे. हा बोगदा 'न्यू ऑस्ट्रेलियन टनेलिंग मेथड' नावाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आला होता, ज्याला 'डिझाइन अॅज यू गो' पद्धती म्हणूनही ओळखले जाते.
कोविड-१९ महामारीतही या महत्त्वाच्या बोगद्याचे काम सुरूच होते. काम करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. अभियंता आणि सुमारे २ हजार कामगारांच्या माध्यमातून हे काम पूर्ण होत आहे.
सुमारे ५५,००० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणारा हा हरित द्रुतगती महामार्ग राज्यातील १० जिल्ह्यांतून जाणार आहे. यामध्ये ठाणे, नाशिक, अहमदनगर, जालना, औरंगाबाद, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूरचा समावेश आहे. एक्स्प्रेस वेवर पेट्रोल, सीएनजी पंप, इलेक्ट्रिक चार्जर, हॉटेल आदी सुविधा उभारण्याचे कामही सुरू आहे.