Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar Tendernama
टेंडर न्यूज

सरकारच्या लोकप्रिय घोषणांचा पहिला फटका PWDच्या कंत्राटदारांना; बिले लटकली...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांची चारशे कोटी रुपयांहून अधिक रकमेची बिले सरकारने थकवली आहेत. त्यामुळे संतप्त कंत्राटदारांनी मंत्रालयावर धडक मारली. पण 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनच्या दिवशी दिला जाईल, तोपर्यंत बिलांची रक्कम मागू नका, अशी भूमिका सरकारने घेतली आहे. तसेच कंत्राटदारांनी यापुढे कोणतीही ऍडव्हान्स कामे करू नयेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

निवडणूक डोळ्यासमोर ठेवत राज्य सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना लागू केली. या योजनेसाठी 45 हजार कोटी रुपये खर्च आहे. त्याशिवाय प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये योजना आणि लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे. पण सध्या सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी निधीची तरतूद करण्यासाठी वित्त विभागाकडे पैसे नाहीत. त्याचा सर्वात पहिला फटका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांना बसला आहे.

मार्च महिन्यात कंत्राटदारांनी संपाचा इशारा दिला. त्यानंतर कंत्राटदारांनी मध्यरात्री दीड वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाला फोन केला आणि बिलाचे पैसे देण्यास सांगितले. पण तेही पूर्ण पैसे मिळाले नाहीत. तिजोरीत खडखडाट असतानाही मंत्र्यांच्या बंगल्यावर, दालनावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली आहे. पण कंत्राटदारांचे पैसे देण्यासाठी सध्या सरकारकडे पैसे नाहीत. मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमच्या कामाचेही पैसे थकले आहेत.

या कंत्राटदारांनी गुरुवारी सार्वजानिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या दालनात धडक मारली आणि थकीत बिलांची विचारणा केली तेव्हा रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात पहिल्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे वित्त विभागाने इतर सर्व कामांचा निधी व फाईल्स थांबवल्या आहेत. त्यामुळे रक्षाबंधन झाल्यावरच पैसे दिले जातील, असे सचिवांनी स्पष्ट केले. 1 ऑगस्टपासून कंत्राटदारांनी ऍडव्हान्समध्ये पुढील कोणतीही कामे करू नयेत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदारांना दिले आहेत. प्रलंबित बिलांची रक्कम अदा करताना सर्वांना सम प्रमाणात दिली जाणार आहेत.