MTHL Tendernama
टेंडर न्यूज

Mumbai : नाताळची भेट; विश्वविक्रमी समुद्री सेतू 25 डिसेंबरला खुला होणार?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्री सेतू म्हणून ओळखला जाणारा, 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक' (MTHL) पुढील महिन्यात लोकांसाठी खुला केला जाणार आहे. २५ डिसेंबरला हे उद्घाटन पार पडेल, अशी चर्चा आहे. यामुळे दक्षिण मुंबईला रायगडशी जोडणारी अखंड व थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तसेच मुंबई व नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे-द्रूतगती महामार्ग व मुंबई गोवा महामार्ग यामधील अंतर कमी होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमाद्वारे मुंबई ट्रान्स हार्बर लिंकबद्दल महत्त्वपूर्ण माहिती पुढे आणली आहे. 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक उभारण्याकरिता स्टॅच्यू ऑफ लिबर्टीसाठी वापरण्यात आलेल्या काँक्रीटच्या सहा पट म्हणजेच ९,७५,००० घनमीटर काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे. बुर्ज खलिफाच्या ३५ पट उंचीच्या म्हणजेच सुमारे ३५ किमी लांबीच्या पाईल लाईनर्सचा प्रकल्पात वापर करण्यात आला आहे. शिवाय, १७ आयफेल टॉवरच्या वजनाइतक्या म्हणजे १,७०,००० मे. टन स्टीलच्या सळ्यांचा वापर करण्यात आला आहे.'

'दक्षिण मुंबईला रायगडशी जोडणारी अखंड व थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. यामुळे मुंबई व नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे-द्रूतगती महामार्ग व मुंबई गोवा महामार्ग यामधील अंतर कमी होणार आहे. जगातील 10 व्या क्रमांकाचा व भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्र सेतू आहे. यामध्ये ऑर्थोट्रॉपीक स्टील डेक तंत्रज्ञानाचा भारतात प्रथमच वापर करण्यात आला आहे. पृथ्वीच्या व्यासाच्या 4 पट म्हणजे 48,000 कि. मी लांबीच्या प्रिस्ट्रेसींग वायर्सचा वापर केला आहे. इंधन, वाहतूक खर्च व वेळेत 1 तासाची बचत होणार आहे. ओपन रोड टोलिंग सिस्टिम असलेला देशातला पहिलाच प्रकल्प असणार आहे.' अशी महत्त्वाची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

हा भारतातील सर्वात लांब सागरी पूल असेल, ज्यावरुन दररोज ७० हजारांहून अधिक वाहने ये-जा करतील. भाजपने एमटीएचएलच्या उद्घाटनाची तारीख जाहीर केली असली तरी राज्य सरकारने अद्याप याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षी मे महिन्यात एमटीएचएलला भेट दिली होती आणि शेवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंकवर गाडी चालवली होती. या सागरी मार्गाला अटलबिहारी सेतू असे नाव देण्यात आले आहे. पुलाचे ९७ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामही निर्धारित वेळेत पूर्ण केले जाणार आहे. या सागरी सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई अंतर केवळ २० मिनिटांत पूर्ण होणार आहे.