मुंबई (Mumbai) : राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) कारशेडसाठी ठाण्यामधील मोघरपाड्यातील १७४ हेक्टर जागा हस्तांतरित केली आहे. याबाबतचा सरकारी निर्णय सोमवारी जारी करण्यात आला आहे.
एमएमआरडीएच्या ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील 'वडाळा – कासारवडवली मेट्रो ४', 'कासारवडवली – गायमुख मेट्रो ४ अ', 'गायमुख – शिवाजी चौक (मीरारोड)' आणि 'वडाळा – सीएसएमटी मेट्रो ११' मार्गिकांसाठी ठाण्यात एकात्मिक कारशेड उभारण्यात येणार आहे. यासाठी एमएमआरडीएने मोघरपाडा येथील १७४.०१ हेक्टर जागा निश्चित केली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना ही जागा भाडेतत्त्वावर दिली आहे. ही जागा एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याचा शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला. शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याच्या अटीवर ही जागा हस्तांतरित करण्यात आली. त्यानुसार १६७ शेतकऱ्यांना त्यांच्या भूखंडाच्या २२ टक्के विकसित भूखंड मोबदला म्हणून देण्यात येणार आहे. अतिक्रमित जागेवरील ३१ शेतकऱ्यांना त्यांच्या एकूण भूखंडाच्या १२ टक्के विकसित भूखंड मोबदला म्हणून देण्यात येणार आहे.
मोघरपाडा येथील ठाणे मेट्रो कारशेडच्या किंमतीत तब्बल दोनशे कोटींच्या वाढीला मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नुकतीच मान्यता दिली आहे. या कारशेडसाठी ९०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मेसर्स एस.ई.डब्लू आणि व्ही.एस.ई यांच्या एकत्रित कंपनीस हे २४ टक्के दरवाढीचे टेंडर देण्यात आले आहे. आता ही जागा विनामोबदला हस्तांतरित झाल्याने लवकरच एमएमआरडीए जागेचा ताबा घेणार आहे. तसेच त्यामुळे आता कारशेडच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.